मुंबई : सीमा शुल्क विभागातर्फे करण्यात येणाऱ्या लिलावातील सोने स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुर्ल्यातील व्यावसायिची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वाकोला पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार इम्तियाज शेख (४४) यांचा मटण वितरणाचा व्यवसाय आहे. तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांची ओळख दोन आरोपींसोबत झाली. सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले सोने पावतीसह स्वस्तात मिळवून देऊ, देशातील मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे गुंतवणूक करतात, असे त्यांनी शेख यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने तीन वेळा आरोपींना पैसे दिले. तीन वेळा त्यांनी सोन्याची लगड स्वस्तात आणून दिली. त्यामुळे शेख यांचा आरोपींवर विश्वास बसला होता.

सहा किलो सोने

एका आरोपीने सप्टेंबर २०२३ मध्ये सीमाशुल्क विभागाचे सहा किलोचे पार्सल आले आहे. स्वस्तात हे सोने मिळत असून आपल्या खात्यावर दोन ते तीन कोटी रुपये आहेत. पण एका व्यक्तीला एक कोटी रुपये रोख द्यायचे आहेत. त्यामुळे एक कोटी रुपये रोख दिले, तर मोठा नफा कमवता येईल, असे आमिष आरोपीने तक्रारदाराला दाखवले. एका दिवसांत एवढी रक्कम जमा करणे शक्य नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराला रक्कम देता आली नाही.

मित्रांकडून घेतले पैसे

तक्रारदारांनी परिचित व्यक्ती, मित्र व ग्राहक यांच्याकडून रक्कम घेतली. तसेच व्यवसायासाठी ठेवलेले ५५ लाख रुपये आणि मित्र, नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम असे एकूण एक कोटी रुपये त्यांनी जमा केले. तक्रारदाराने ऑक्टोबर महिन्यात आरोपींना ही रक्कम दिली. त्यानंतर तक्रारदार वारंवार आरोपींच्या संपर्कात होते. आरोपींनी तुमची रक्कम सीमा शुल्क विभागात दिली आहे. लवकरच तुमचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत तक्रारदाराला रोख रक्कम अथवा त्याबदल्यात सोने मिळाले नाही. आरोपींनी तक्रारदारासोबत संपर्क तोडल्यानंतर व्यावसायिकाने अखेर याप्रकरणी खार पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल

व्यावसायिकाच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी पाच आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४०६ (फौजदारी विश्वासघात) व ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तक्रारदाराचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. सर्व आरोपी तक्रारदाराच्या ओळखीचे आहेत. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.