मुंबईः नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवरही पोलीस लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यांवरील १४० आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
नागपुरातील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्रीपासून संचारबंदी जाहीर केली. बुधवारी देखील संचारबंदी कायम असून दंगलीतील संशयितांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यभरातील सर्व पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक हिंसक घटनांना खतपाणी घालण्याची शक्यता असल्यामुळे त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समाज माध्यमांवरही महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेऊन आहे.
समाज माध्यमांवरूनही आक्षेपार्ह पोस्ट व प्रक्षोभक पोस्टद्वारे हिंसक घटनांना खतपाणी घालण्याची शक्यता लक्षात घेता समाज माध्यमांवरही पोलिसांना लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरून १४० प्रक्षोभक पोस्ट शोधून काढल्या असून त्या तात्काळ हटवण्याबाबत संबंधित कंपन्यांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. तसेच संबंधित समाज माध्यम खाते कोण हाताळत आहे, याबाबाबची माहितीही मागवण्यात आली आहे. या पोस्टबाबत संबंधित व्यक्तींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सायबर विभागही समाज माध्यमांवर नियमित लक्ष ठेऊन असतात. दोन वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यात आल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यात ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्युबवरील चित्रफिती यांचा समावेश आहे.
नागपूर येथे सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर अजूनही नागपुरातील अनेक भागांत तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी बुधवारी देखील कायम होती. राज्यातील इतर भागांतही त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिस आणि प्रशासन सतर्क आहे. दरम्यान दंगलीतील सहभागींचा शोध घेऊन चौकशी आणि अटकेचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.