मुंबई : काळाचौकी पोलिसांच्या हद्दीतून १७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीला शोधण्यात अखेर पोलिसांना यश आले. कोणतीही ठोस माहिती नसताना तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी या व्यक्तीला शोध घेतला आणि मुरबाड येथून बेपत्ता व्यक्तीचा शोधून काढले. त्यानंतर त्यांची कुटुंबियांसोबत भेट घडवून आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ वर्षांपूर्वी पती बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेने केली. राज्य महिला आयोगामार्फत तक्रारदार महिलेचे एप्रिल २००७ मध्ये पती घरातून निघून गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याबाबत महिलेने तक्रार अर्ज केला होता. महिला आयोगाकडून आलेल्या तक्रारीची पोलिसांनी १२ मार्च २०२४ रोजी नोंद केली. संबंधित व्यक्ती एप्रिल २००७ मध्ये बेपत्ता झाल्यानंतर एवढ्या वर्षांनी ही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे बेपत्ता असलेल्या व्यक्ती चंद्रकांत कानू जोशी यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी जोशीच्या परिचित व्यक्तींकडून माहिती घेण्यास सुरूवात केली त्यावेळी चंद्रकांत जोशी यांचे मित्र, त्याचा चुलत भाऊ, सख्खी बहीण यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यांनाही चंद्रकांतबाबत काहीच माहिती नव्हती. पण पोलिसांनी त्यानंतरही तपास सुरूच ठेवला.

बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना वेगवेगळया तांत्रिक पध्दतीचा उपयोग करून जोशी यांच्याबद्दल विविध व्यक्तींना विचापूस करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या एका मित्राने त्यांना फार वर्षांपूर्वी पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मित्राकडून माहिती घेतली असता २०१५ – १६ मध्ये मुरबाड येथे एका फॉर्म हाऊसमध्ये त्यांना पाहिल्याचे सांगितले. पण खूप वर्ष झाल्यामुळे त्याला फार्महाऊसचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मुरबाड परिसरातील फार्महाऊसवर जाऊन जोशी यांच्याबद्दल चौकशी केली. त्यावेळी एका व्यक्तीने जोशींना पाहिल्याचा दावा केला. त्याला याबाबत अधिक विचारले असता मौजा चौरे या गावातील एका फार्महाऊसमध्ये चंद्रकांत कानू जोशी काम करत असल्याचे त्याने सांगितले. पोलीस पथकाने तेथे जाऊन पाहिले असता जोशी तेथे काम करताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी सर्व प्रकार सांगून जोशी यांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. जोशी यांना काळाचौकी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तक्रारदार महिलेला बोलावून तपासणी करण्यात आली. तक्रारदार महिने त्यांना ओळखले. अशा प्रकारे २००७ मध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तीला कोणतीही माहिती नसताना काळचौकी पोलिसांनी शोधून काढले व कुटुंबियांसोबत त्यांची भेट घडवून आणली.