मुंबई : बालगृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नातेवाईक शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची दिल्ली, उत्तरप्रदेशसह विविध राज्यात शोधमोहिम सुरू केली असून मुलाचा मृतदेह नेण्यासाठी जवळपास महिना झाला तरी नातेवाईक पुढे आलेले नाहीत. पोलिसांना हसवान निषाद हा मुलगा गिरगाव चौपाटीवर सापडला होता. त्याला ऑगस्टमध्ये माटुंगा येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. निषाद मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि तो नीट संवाद साधू शकत नव्हता. किरकोळ वादातून चार अल्पवयीन मुलांसह सहा कैद्यांनी त्याची बालगृहात हत्या केली, त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निषाद जिवंत असताना त्याने केवळ तीन शब्दांत पत्ता सांगितला होता. त्यात पारस शाळा, बस्तीपाडा, स्टार चौक असे शब्द होते. त्याच्या पालकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी पोलिस या मार्गांवर काम करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुलाच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातही पथक जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> जखमी गोविंदा अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत; करीरोड येथे महापौरांनी घेतली भेट
हेही वाचा >>> मुंबईत लेप्टोचा धोका वाढतोय; आठवड्याभरात नऊ नवीन रुग्ण
निशाद डी.बी. मार्ग पोलिसांना ६ ऑगस्ट रोजी गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरताना सापडला होता. त्याला सरंक्षणाची गरज असल्यामुळे पोलिसांनी त्याला प्रथम बाल कल्याण समिती समोर हजर केले. बाल कल्याण समितीने त्याला बालसुधारगृह दाखल केले होते. डेव्हिड ससून बालगृहातील विलगीकरण कक्षात त्याला ठेवण्यात आले होते. निषाद हा कुणाशी काही बोलत नव्हता. बाल सुधारगृहातील अधिकारी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. पण रात्री १० वाजण्याच्या सुमारास निषाद हा बेशुद्ध अवस्थेत तेथील कर्मचारी यांना मिळाला असता कर्मचारी यांनी याबाबत डेव्हिड ससून बालसुधारगृहाचे अधिकारी यांना कळविले, त्याला तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत बालसुधारगृहतील अधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलिसांना कळविले. पोलिसांनी प्रथम अपमृत्युची नोंद करण्यात आली होती. पण त्याची काळजी घेणाऱ्या एका मुलाने निषादला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.