काळबादेवी येथील रामवाडी परिसरातील आदित्य हाईट्स या इमारतीतील के. डी. एम इंटरप्राइजेसच्या कार्यालयातील ४.०३ कोटी रुपये १० डिसेंबर रोजी चोरांच्या टोळीने लुटले होते. मुंबई पोलिसांनी केवळ तीस तासांत या गुन्ह्याची उकल करीत गुजरातमधून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आदित्य हाईट्स या इमारतीत १० डिसेंबर रोजी चोरांनी चोरी करण्याचा कट रचला. चोरांनी के. डी. एम इंटरप्राइजेसच्या कार्यालयात घुसून दोन इसमांना बांधून ठेवले आणि ४.०३ कोटी रुपयांची रक्कम लुटून पोबारा केला.
हेही वाचा >>> दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
या गुन्ह्याची माहिती मिळताच लोकमान्य पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधकार्यात पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेतली. परिमंडळ २ मधील लोकमान्य टिळक पोलीस ठाणे, पायधुनी पोलीस ठाणे, व्ही. पी रोड पोलीस ठाणे आदी ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार करून आरोपींचा तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी संपूर्ण रोकड घेऊन गुजरातमध्ये फरार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलीस पथके गुजरातच्या दिशेने रवाना झाली. अखेर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. तसेच ४.०३ कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. हर्षद ठाकूर (२६), राजुबा वाघेला (२१), अशोकभा वाघेला (२६), चरणभा वाघेलर (२६), मेहूलसिंग ढाबी (२४) आणि चिराग ठाकूर (२६) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात कलम ४५४, ३९२, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.