मुंबईतला अखेरचा मराठा मोर्चा पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन या नित्याच्या जबाबदाऱ्या पोलिसांच्या अंगवळणी पडलेल्या. त्यामुळे मोर्चाला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली तरी ती अडचण नव्हतीच. मोर्चासाठी राज्यभरातून मुंबईत उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत अन्य कोणी घातपात घडवला तर..? समाजमाध्यमांवरून एका झटक्यात पसरणारी अफवा, त्यावर विश्वास ठेवून प्रतिक्रिया देणाऱ्या जमावाची मानसिकता, हे संभाव्य धोके आवरून मोर्चासाठी आलेल्या प्रत्येकाला सुरक्षितपणे माघारी धाडणे हे पोलिसांसमोरचे मुख्य आव्हान होते. ते पोलिसांनी स्वीकारले आणि अचूकपणे पेलले.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत इतका जमाव एकत्र आला नव्हता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनासाठी मुंबईत उसळलेल्या गर्दीपेक्षाही मोर्चा मोठा होता, असेही तो म्हणाला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी याआधी ५७ मोर्चे राज्याच्या विविध भागांमध्ये काढण्यात आले होते. मुंबईतला मोर्चा अखेरचा होता. त्यामुळे आयोजकांकडून जास्तीत जास्त समाजबांधव मुंबईत आणण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू होते. ठिकठिकाणी मोर्चे झाल्यानंतर त्या त्या भागात मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांची फळी पुढे आली होती. ती नंतरच्या मोर्चामध्ये सक्रिय सहकार्य करत होती. या अखेरच्या मोर्चात राज्यातल्या सर्व फळ्या एकत्र येणार होत्या. आयोजकांनी दहा लाखांहून जास्त मराठे मुंबईत येतील, असा अंदाज वर्तवला होता.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

आझाद मैदान दंगलीची जखम अद्यापही पोलीस विसरलेले नाहीत. तेव्हाचा विस्कळीतपणा, कार्यक्रमाआधीच्या हालचाली टिपून नेमका अंदाज, शक्यता वर्तवण्यात अपयशी ठरलेल्या गुप्तहेर यंत्रणा, नियोजन नसल्याने दंगल उसळल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी झालेला विलंब यापैकी एकही उणीव मराठा मोर्चात पोलिसांना शिल् लक ठेवायची नव्हती. साधारण किती गर्दी उसळेल यासोबत या मोर्चाबाबत अन्य धर्म, समाजांमध्ये सुरू असलेल्या चर्चा, प्रतिक्रिया काय आहेत, एखादी दहशतवादी संघटना किंवा देशाला अस्थिर ठेवण्यासाठी सतत धडपड करणारी एखादी विचारसरणी मराठा मोर्चाच्या निमित्ताने संधी साधू शकेल का याचा अंदाज घेणे, त्या दृष्टीने सतत लक्ष ठेवणे, माहिती घेऊन तिथल्या तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे होते. मोर्चाच्या कैक दिवस आधीपासून पडद्याआडून पोलिसांनी ही तयारी सुरू केली होती. अशा प्रकारची परस्पर माहिती काढण्यात मुंबई पोलिसांची विशेष शाखा तरबेज आहे. विशेष शाखेच्या संबंधित सर्व शाखा विविध धर्माच्या, समाजाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या कामात गुंतल्या. प्रत्येक पोलीस ठाण्यात मील्स स्पेशल नावाचा गुप्तहेर विभाग कार्यरत असतो. राजकीय, सामाजिक घडामोडींचा परिणाम, प्रतिक्रिया, हालचाली यावर लक्ष ठेवून माहिती काढण्याची जबाबदारी या विभागावर असते. त्यामुळे लालबाग, परळपासून शहराच्या मराठमोळ्या वस्त्यांमध्ये मोर्चाची तयारी पोलीस हेरू लागले. मुंबईवगळता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हा अंदाज घेण्याची जबाबदारी राज्य गुप्तवार्ता विभागाकडे होती. जिहादी विचारसरणी, दहशतवादी संघटनांच्या पाठीराख्यांच्या (स्लीपर सेल) हालचालीही राज्य दहशतवादविरोधी पथक, मुंबई पोलिसांकडून टिपल्या जात होत्या. त्यासाठी केंद्रीय गुप्तहेर संघटनांकडूनही इनपूट्स घेतले जात होते. ही प्रक्रिया मोर्चासमाप्तीपर्यंत सुरूच होती.

दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी मुंबईच्या नेहमीच्या वेगाला ब्रेक लागू न देता वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, बंदोबस्त हे नियोजन सुरू होते. आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, सहआयुक्त (वाहतूक), अतिरिक्त आयुक्त रवींद्र शिसवे (विशेष शाखा), अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ, एस. जयकुमार, अशोक दुधे, मनोजकुमार शर्मा, ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. रश्मी करंदीकर आणि अन्य अधिकारी या नियोजनात होते.

मुंबईबाहेरून येणाऱ्या वाहनांना ठाणे, नवी मुंबईत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही मुंबईत साधारण १२ ते १५ हजार वाहने येतील असा पोलिसांचा अंदाज होता. तो खरा ठरला; पण पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे, नेहमीच्या वाहनांना अडथळा न होता मोर्चेकऱ्यांची वाहने वाहनतळावर जाण्यासाठी विशेष मार्गाचे (डेडिकेटेड रूट) नियोजन करणे महत्त्वाचे होते. त्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई पोर्ट ट्रस्टशी बोलणी करून रे रोड येथील सिमेंट यार्ड मिळवले. तिथे साधारण वीस हजार वाहने पार्क होतील इतकी मोकळी जागा उपलब्ध करून घेतली. याशिवाय वडाळा येथील गोल्डन यार्डही पार्किंगसाठी उपलब्ध करून घेतले. दहिसर, वाशी आणि ठाणेमार्गे या वाहनतळांकडे येणारी मोर्चेकऱ्यांची वाहने वडाळा, रे रोड इथल्या वाहनतळांवर जाताना पूर्व मुक्त मार्गावरून न जाऊ देता सुमन नगर चौकातूनच मार्गस्थ करण्यात आली. त्यामुळे सकाळी दक्षिण मुंबईत येणाऱ्या नेहमीच्या वाहनांनी अडथळा अनुभवला नाही.

वाहतुकीच्या नियोजनाबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक दुधे सांगतात, बाहेरून येणारी किंवा शहरातून मोर्चासाठी निघणारी वाहने कोणत्या मार्गावरून वाहनतळाकडे जातील हे आयोजकांसोबतच्या बैठकीत ठरवून त्याचा नकाशा आठ ते दहा दिवसांआधीच जाहीर केला गेला. तो नकाशा राज्यात सर्वदूर पसरेल आणि या नकाशात दाखवलेल्या मार्गाचाच वापर मोर्चेकरी वाहने करतील यासाठी प्रयत्न केले गेले. वाहतूक नियोजनासाठी आयोजकांसोबत विविध पातळ्यांवर साधारण आठ ते दहा बैठका पार पडल्या. त्यात अपेक्षित वाहनांच्या अंदाजासोबत आलेली वाहने घाईगर्दी न करता वाहनतळावर सुरळीतपणे कशी पोहोचतील, तिथून सुरळीतपणे माघारी कशी फिरतील याचे नियोजन करण्यात आले. मुंबईत शिरताच प्रत्येक टप्प्यावर वाहतूक पोलिसांसोबत आयोजकांचे स्वयंसेवक मोठय़ा संख्येने तैनात होते. मोर्चाच्या आधी समाजमाध्यमांच्या आधारे मुंबईकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच एफएम रेडिओसह समाजमाध्यमांवरून त्या त्या वेळेचे वाहतुकीचे अपडेट्स दिले जात होते.

मोर्चासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंद ठेवावा लागणार होता. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणारी, तेथून मध्य मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला पर्याय उपलब्ध करून दिले. उदाहरणार्थ दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक माटुंगा, दादर, नायगावकडूनच रफी अहमद किडवई मार्गावर (चार रस्ता) वळवण्यात आली. मोर्चाच्या आदल्या दिवशी सर्व पर्यायी मार्ग दुतर्फा पार्क केलेली वाहने काढून मोकळे, सुटसुटीत करण्यात आले. याशिवाय मोर्चा जसजसा पुढे सरकत होता तसतसेच मागील म्हणजेच माटुंगा, दादर, लालबाग, चिंचपोकळी येथील बंद केलेले मार्ग, उड्डाणपूल वाहतुम्कीसाठी खुले केले गेले. वरळी येथील नियंत्रण कक्षातून मोर्चा मार्ग आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हींवर करडी नजर होती. जरा कुठे वाहतूक खोळंबल्याचे दिसले रे दिसले की तिथे अधिकारी, कर्मचारी पाठवून रस्ता मोकळा करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या. त्यामुळे नेहमीच्या वाहनसंख्येत मोर्चेकऱ्यांच्या वाहनांची भर पडूनही दखल घ्यावी, अशी वाहतूक कोंडी कोठेही घडली नाही, दुधे सांगतात.

शहरात आदल्या दिवसापासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दल, सशस्त्र दल, क्विक रिस्पॉन्स टीमचे प्रशिक्षित कमांडो, स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेप्रमाणे अन्य विशेष पथकांतील अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात उतरवण्यात आले. भायखळा ते आझाद मैदान या मोर्चा मार्गात बंदोबस्ताची भक्कम तटबंदी उभारण्यात आली. मराठा मोर्चाचे काळ्या रंगाचे टीशर्ट घालून कर्तव्यावरील पोलीसही मोर्चात सहभागी होताना दिसत होते. बंदोबस्ताव्यतिरिक्त मुख्य नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हींच्या आधारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. सहआयुक्त देवेन भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही चित्रणाआधारे बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. आझाद मैदान किंवा मोर्चा मार्गात कुठेही कायदा व सुव्यवस्था उद्भवल्यास पोलिसांची वाहने इथून तिथे पोहोचू शकतील यासाठी जे जे उड्डाणपुलावर विशेष मार्गिका करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये लक्षात घेऊन रुग्णवाहिकाही सहजरीत्या इथून तिथे जाव्यात हाही विशेष मार्गिका करण्यामागचा उद्देश होता. ड्रोन्सच्या साहाय्याने एका झटक्यात आझाद मैदान व आसपासच्या परिसरातील गर्दीवर उंचावरून लक्ष ठेवले जात होते. बंदोबस्तासह अनुचित प्रकार घडल्यास तो आवरण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, मनुष्यबळाचीही तजवीज ठेवली होती.

अचूक नियोजन, आयोजकांनी केलेले सहकार्य, मोर्चात सहभागी झालेल्यांनी पाळलेली शिस्त, मुंबईकरांनी पाळलेला संयम या जोरावर मोर्चाचे आव्हान पार पाडले, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व्यक्त करतात.

जयेश शिरसाट jayesh.shirsat@expressindia.com

Story img Loader