टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर २०२२ रोजी अपघाती निधन झाले. भविष्यात रतन टाटांच्या आयुष्यात असंच घडू शकतं, त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा इशारा देणारा एक फोन मुंबई पोलिसांना आला होता. जगप्रसिद्ध रतन टाटा यांच्याच सुरक्षेविषयी असा इशारा आल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रतन टाटांच्या सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी एक विशेष पथक नेमण्यात आलं होतं. तर, इतर टीमला या कॉलरपर्यंत पोहोचण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. पोलिसांनी तांत्रिक सहाय्याने आणि मोबाईल फोन कंपन्यांच्या मदतीने कॉलरचा माग काढला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकात असल्याचं आढळलं. तसंच, तो पुण्याचा रहिवासी असल्याचंही पोलिसांनी समजलं.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुण्यातील निवासस्थानी धाड मारली. परंतु, तो तिथेही सापडला नाही. तसंच, गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात केली होती. त्याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असताना संबंधित कॉलरला स्किझोफ्रेनिया असल्याचं समजलं. तसंच, त्याने कोणालाही न कळवता कोणाच्या तरी घरातून त्याने फोन केला. या फोनवरून त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन लावला आणि रतन टाटा यांना धमकावले. त्याच्याविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित कॉलरला स्किझोफ्रेनिया असला तरीही तो उच्चशिक्षित असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. त्याने फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचेही त्यानं शिक्षण घेतलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police tracks down karnataka man who made call to threaten ratan tata caller has schizophrenia sgk
Show comments