लोकल ट्रेनमध्ये अमेरिकन तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहेत. पोलिसांनी पिडीत तरुणीच्या मोबाइल फोनचा ‘आयएमईआय’ क्रमांक शोधला आहे.
आयफोन कंपनीशी संपर्क साधून मोबाइलच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी आणखी १५ संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
रविवारी संध्याकाळी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मिशेल मार्क्‍स (२४) या अमेरिकन तरुणीवर अज्ञात इसमाने ब्लेडने हल्ला करून तिचा आयफोन हिसकावला होता. मरीन लाईन्स आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करून त्याच्या अटकेसाठी सहा पथके तयार केली आहेत.
रेखाचित्राशी मिळत्याजुळत्या एका संशयितालाही पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांना या आयफोनचा ‘आयएमईआय’ क्रमांक शोधला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी आम्ही आता तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहोत, असे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. पी. वडमारे यांनी सांगितले. आयफोन कंपनीला संपर्क करून सिमकार्डशिवाय फोनचा ठावठिकाणा मिळतो का त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हल्ल्यातील जखमी मिशेलवर अंधेरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.