ट्विटर, फेसबुक, यूटय़ूब आदींवर काय सुरू आहे, लोकांचा कल काय आहे त्यावर आता मुंबई पोलीस नजर ठेवणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी ‘सोशल मीडिया लॅब’ तयार केली आहे. अभिनेता अभिषेक बच्चन याच्या उपस्थितीत शनिवारी या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
कुठल्याही घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटत असतात. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर ट्विटर आणि फेसबुकवर त्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या दंगलीची पूर्वतयारी याच सोशल साइटवर झाली होती. ‘जनमत’ काय आहे हे इंटरनेटवर प्रतििबबित होत असते. ट्विटर, फेसबुक, यूटय़ूब तसेच ईमेलवरून एखाद्या विषयावर नेटिझन्स आपले मत प्रदर्शित करीत असतात. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवून कायदा-सुव्यवस्था राखणे आणि इतर खबरदारीचे उपाय योजण्यासाठी ही ‘सोशल मीडिया लॅब’ तयार करण्यात आली आहे. त्यासाठी २० पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘नॅसकॉम’ आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने तयार करण्यात आलेली ही प्रयोगशाळा ‘विशेष शाखा १’च्या मुख्यालयात उघडण्यात आली आहे. याबाबात मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सांगितले की, दर मिनिटाला एक लाख ट्विट होत असतात. प्रत्येक ट्विट तपासणे शक्य नाही. परंतु या लॅबमुळे कुठल्या विषयावर इंटरनेटवर चर्चा होत आहे, नेटिझन्सचा कौल काय आहे ते समजू शकणार आहे. अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेले अनेक जण फोन टॅपिंगपासून वाचण्यासाठी इंटरनेट व सोशल साइट्सचा आधार घेतात. त्यांच्या हालचालीही समजण्यास आता मदत होणार आहे. या उपक्रमाचे अभिनेता अभिषेक बच्चननेही कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा