निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला असला, तरी शेवटचा दिवस ‘अर्थपूर्ण’ करण्यासाठी सारे पक्ष सरसावणार हे लक्षात घेऊन जागोजागी पोलिसांनी खडा पहारा लावला आहे. मतदारांना खिशात घालण्यासाठी त्यांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम अखेरच्या अठ्ठेचाळीस तासांत पार पडतो. एकगठ्ठा मतांसाठी ओल्या पाटर्य़ाही याच काळात होतात, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पोलिसांनी काही अड्डे हेरून ठेवले आहेत. मात्र, हा प्रकार पुरता रोखण्याचे आव्हान तितकेसे सोपेही नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मतदारांना होणाऱ्या पैसेवाटपाला आळा घालण्यासाठी जागोजागी वाहन तपासणी झाली. मात्र, त्यालाही बगल देत नोटांची बंडले रवाना करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविल्या गेल्या. सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांची वाहने अडविली जात नाहीत, हे लक्षात घेऊन त्या गाडय़ांतूनही बंडले रवाना झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या काही दिवसांत मुंबईत पोलिसांनी सुमारे साडेपाच कोटी रुपये हस्तगत केले असले तरी तांत्रिकदृष्टया हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी होते हे  सिद्ध करणे अवघड झाले आहे. पुण्यात पैशाचे ‘पतंग’ उडविण्यात आल्याने मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी पोलीस ठाण्यातच धरणे धरल्याने विश्वजित कदम यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबई, ठाणे, नाशिक व नंदुरबारसह अनेक ठिकाणी मतदारांसाठी पैशाच्या थैल्या मोकळ्या होत आहेत. झोपडपट्टय़ांत एका मताला हजार ते पाच हजार रुपये देण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे मतदान केंद्रांवर पाठवायच्या प्रतिनिधींच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच पैशाचे वाटप कोणत्या ठिकाणी, कसे व कोणामार्फत करावे लागेल, याचेही नियोजन जोरात आहे.

Story img Loader