मुंबई पोलिसांकडून कायमच वेगवेगळे अनोखे उपक्रम राबवले जातात. एरवी गुन्हे रोखण्यासाठी काम करणाऱ्या याच मुंबई पोलिसांकडून व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जाणार आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जेष्ठ नागरिकांसोबत व्हेलेंटाईन डे साजरा करून पोलिसांकडून जनजागृती केली जाणार आहे. गोरेगाव ते दहिसर या परिसरातील परिमंडळ-१२ मध्ये हा अभिनव व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे बोलले जात आहे.

एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे काम मुंबई पोलीस करतात. हेच नागरिक सायबर गुन्ह्यात बळी पडू नयेत म्हणून त्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्याचे काम या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. बहुतांश वेळा या सायबर गुन्ह्याला ज्येष्ठ नागिरक बळी पडतात, मात्र अशावेळी त्यांची फसवणूक होऊ नये याकरता अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १२ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठासोबत अभिनव व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी परिमंडळ-१२ च्या पोलिसांनी गोरेगाव ते दहिसर या परिसरात एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची यादी तयार करून त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करणार आहेत. या कार्यक्रमात जनजागृती सोबतच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन आले आहे.

याबरोबरच ज्येष्ठांसाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनेचा त्यांना फायदा होईल याची माहितीही दिली जाणार आहे. सायबर गुन्ह्यांपासून स्वत:ची फसवणूक रोखण्यासाठी ज्येष्ठांना याचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेष्ठांना उद्भवणाऱ्या समस्या मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच या समस्या सोडविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Story img Loader