सर्व गुन्हे सीबीआयकडे हस्तांतरित करणार
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी अनेक गंभीर गुन्ह्य़ांप्रकरणी हवा असलेला कुख्यात गुंड राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा अखेर मुंबई पोलिसांना ताबा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. छोटा राजनवर दाखल असलेले सर्व गुन्हे तपासासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के. पी. बक्षी यांनी पत्रकारांना सायंकाळी उशिरा सांगितले.

छोटा राजनचा ताबा मिळाल्यावर त्याला कुठल्या सुरक्षित जागेत ठेवायचे याबाबत निर्णय होऊन आर्थर रोड तुरुंगातील तळमजल्याच्या जागेसाठी खास अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत छोटा राजनशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला. या बैठकीला बक्षी यांच्यासह महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त जावेद, सहआयुक्त (गुन्हे) अतुल कुलकर्णी तसेच सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती हेही उपस्थित होते. या अचानक झालेल्या निर्णयाने आयुक्तांची मात्र नाचक्की झाली. सकाळी झालेल्या प्रेस क्लबच्या कार्यक्रमात आयुक्त जावेद यांनी, छोटा राजनचा मुंबई पोलिसांना लवकरच ताबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. सायंकाळी उशिरा बक्षी यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन आयुक्त जावेद यांच्यासह संयुक्त वार्ताहर परिषद घेऊन छोटा राजनवरील सर्व गुन्ह्य़ांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारानुसार हा निर्णय घेणे भाग पडले आहे. छोटा राजन हा केवळ मुंबई वा महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्य आणि देशांतही गुन्हेगार आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे. अशा वेळी राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख तपास यंत्रणा सर्व गुन्ह्य़ांचा एकत्र तपास करणार असल्यास ते योग्य होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सीबीआयला आवश्यक ती सर्व मदत मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस करील, असेही बक्षी यांनी सांगितले. छोटा राजनवरील गुन्ह्य़ांचा तपास सीबीआय दिल्ली वा मुंबई येथे करू शकतात. मुंबईत तपास केल्यास आम्ही सर्व ते सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणेने राग काढला?
निशांत सरवणकर, मुंबई : छोटा राजन याचा अखेर मुंबई पोलिसांना कधीच ताबा मिळणार नाही, हे राज्याचे गृहसचिव के. पी. बक्षी यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले असले तरी यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा मुंबई पोलिसांवर असलेला राग हे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. दाऊद ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छोटा राजन टोळीतील विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा या दोघांना दिल्लीत अटक करून मुंबई पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेबरोबर वाद झाल्याने याचाच सूड उगविल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अधिकृतपणे कोणी काहीही सांगण्यास तयार नसले तरी बुधवारी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांनाच तसा निरोप देण्यात आल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन छोटा राजनची प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे जाहीर केले.
मुंबई पोलिसांवर आरोप करून छोटा राजनने खळबळ माजवून दिली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीत जाऊन केलेली कारवाई ही वादाचा विषय ठरली होती. त्यावेळी गुप्तचर विभागातील एक अधिकारीही रंगेहाथ पकडला गेला होता. परंतु वरून सूत्रे हलली आणि फक्त विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा याचा मुंबई पोलिसांना ताबा मिळाला. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणेचा मुंबई पोलिसांवर कायम राग राहिला आहे. विकी मल्होत्रा याला पाच वर्षांची सजा झाली आणि तो जामिनावर बाहेर आला. तो नंतर कुठे गेला, याचा तपास लागलेला नाही.

Story img Loader