मुंबईः दहावी व बारावीच्या शालांत परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान मुंबईतील ८७१ परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणार आहेत. त्या परिक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, तसेच या परीक्षांमध्ये काॅपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून अनेक काॅपी बहद्दर हे परीक्षा केंद्रावर येत असल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे. त्यात प्रामुख्याने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात दाखवल्या प्रमाणे ब्ल्यूटूथच्या माध्यमाचा जास्त वापर केला जात आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी आता परीक्षा केंद्राबाहेरील १०० मीटर परिसरातील एटीडी, आयएसडी, टेलिफोन बुथ, फॅक्स, झेराॅक्स मोबाइल फोन, लॅपटाॅप ब्लूतूथ, इॉटरनेट प्रसार माध्यमे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर मोबाइल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर रेडिओ, कॅलक्यूलेटर लॅपटाॅप व इतर संपर्क साधणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात वापरण्यास प्रतिबंधक केले आहे. त्याच बरोबर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात परीक्षा केंद्राबाबत कुठलाही मजकूर लिहिण्यास किंवा चिटकवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावर सर्व पोलिसांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दोन्ही परिक्षा अत्यंत संवेदनशिल असल्यामुळे परीक्षेचे कामकाज सुयोग्य पद्धतीने हाताळण्यासाठी याबाबतचे प्रतिबंधत्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त(अभियान )अकबर पठाण यांनी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत.