मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी ‘वर्सोवा – घाटकोपर मेट्रो १’ च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी पहिली लोकल पहाटे ४ वाजता धावणार असून ‘मेट्रो १’ची सेवा मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने मेट्रो प्राधिकरणाला तशी विनंती केली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पहाटे ५ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचावे लागते. तसेच रात्री घरी पोहोचायला त्यांना उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ‘मेट्रो वन’ची सेवा पहाटे ४ पासून मध्यरात्री १ पर्यंत सुरू ठेवावी, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने ‘मेट्रो वन’ प्राधिकरणाला केली होती. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनावर निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी आहे. ‘मेट्रो १’ ही पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडत असल्यामुळे शहर आणि उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यास सोपे जाते. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेट्रो वन’ प्राधिकरणाने ‘मेट्रो १’च्या वेळेत एका दिवसापुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
मेट्रोची सेवा दररोज सकाळी ५.३० वाजता सुरू होते व रात्री वर्सोवा येथून ११.२० वाजता, तर घाटकोपर येथून ११.५० वाजता शेवटची गाडी सुटते. मात्र मतदानाच्या दिवशी या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून पहाटेपासून ४ मध्यरात्री १ पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.
© The Indian Express (P) Ltd