पश्चिम, पूर्व उपनगरात लोकसंख्या वाढ; प्रभागांची पुनर्रचना पुढील आठवडय़ात जाहीर होणार

गेल्या पाच वर्षांत मुंबईची लोकसंख्या १ कोटी १९ लाखांवरून १ कोटी २४ लाखांवर गेल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी मतदारसंख्या मात्र २०१२ मधील १ कोटी २ लाखांवरून २०१७ मध्ये ९१ लाखांवर घसरल्याचा अंदाज आहे. शहराच्या दक्षिण विभागातील लोकसंख्या कमी झाली असून पश्चिम व पूर्व उपनगरात लोकसंख्येत वाढ झाली आहे. यानुसार मुंबईतील पालिका प्रभागांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून पुढील आठवडय़ात शहरातील प्रभागांची पुनर्रचना जाहीर होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शुक्रवारी दिली. या पुनर्रचनेत प्रभागांची संख्या कायम राहणार असली तरी लोकसंख्येनुसार दक्षिण मुंबईतील सहा मतदारसंघ कमी होणार असून पश्चिम उपनगरातील चार व पूर्व उपनगरातील दोन मतदारसंघ वाढणार आहेत. शहरातील मतदारसंख्येतही गेल्या पाच वर्षांत तब्बल ११ लाखांनी घट झाली असून प्रभागांची पुनर्रचना, आरक्षण व मतदारसंख्या या सगळ्यांचे परिणाम निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकसंख्या व मतदारसंख्येत होत असलेले चढउतार व उपनगरात वाढणारी लोकसंख्या याचे प्रतिबिंब प्रभाग पुनर्रचनेत दिसणार आहेत. शहराच्या दक्षिण विभागातील लोकसंख्या कमी झाली असून पश्चिम व पूर्व उपनगरात लोकसंख्येची वाढ झाली आहे.

यानुसार प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून पुढील आठ ते दहा दिवसांत त्याची अधिकृतरीत्या घोषणा होईल. प्रभाग पुनर्रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांना पुढील महिन्याभरात हरकती व सूचना नोंदवता येतील. त्यानंतर एक महिन्याने म्हणजे १५ ते २० ऑगस्टपर्यंत प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाईल. आरक्षणाबाबतही एका महिन्यात हरकती व सूचना मागितल्यावर शहरातील सर्व २२७ प्रभागांचे निश्चित रूप स्पष्ट होईल.

Untitled-5