उन्नत मार्गावर जागा देण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टची मंजुरी; दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस डॉक येथे नवीन रेल्वे स्थानक
अक्षय मांडवकर, मुंबई</strong>
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उन्नत जलद रेल्वेमार्गासाठी जागा देण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) मंजुरी दिली असून त्यांच्या मागणीवरून दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस डॉक येथे या मार्गावरील नवीन स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रस्तावाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यामुळे आता हा उन्नत मार्ग सुकर झाला आहे.
हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद करण्याच्या दृष्टीने ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३’ (एमयूटीपी-३) अंतर्गत ५५ किमीचा सीएसएमटी-पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने एमयूटीपी-३ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ५४७७७ कोटी रुपये प्रकल्प खर्चाला मान्यता दिली. यामध्ये जलद रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी १२,३३१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर ११ स्थानके असतील. सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्र. १८ वरून हा जलद मार्ग सुरू होईल. त्यानंतर ही मार्गिका पी. डीमॅलो मार्गावरून यॅलो गेट ते ऑरेन्ज गेट परिसरात प्रवेश करेल. या मार्गिकेसाठी बीपीटीची सुमारे ८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यामुळे जागेच्या मालकी हक्काचा विचार करून बीपीटीने ‘एमआरव्हीसी’कडे प्रिन्सेस डॉकजवळ नव्या स्थानकाची मागणी केली होती.या मागणीला मान्यता मिळाल्याची माहिती बीपीटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यॅलो गेट ते ऑरेन्ज गेटदरम्यानच्या २ किमी परिसरात उन्नत जलद मार्ग प्रस्तावित आहे. या परिसरातील सागरतटावर ‘ईस्टर्न सीफ्रन्ट प्रकल्प’ उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात या परिसराला भेट देणाऱ्या नागरिकांच्या वाहतुकीच्या सुविधेसाठी आणि जागेच्या स्वामित्व हक्काच्या दृष्टीने आम्ही ‘एमआरव्हीसी’कडे प्रिन्सेस डॉक येथे या नव्या स्थानकाची मागणी केल्याची माहिती बीपीटीच्या अधिकाऱ्याने दिली. ‘एमआरव्हीसी’ने ही मागणी मान्य केल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. ‘ईस्टर्न सिफ्रन्ट प्रकल्पा’अंतर्गत पूर्वतटावर नुकतेच आंतरदेशीय क्रूझ टर्मिनल बांधण्यात आले आहे. येत्या काळात या परिसरामध्ये मरिना, सागरी-खेळ, स्केटिंग ट्रक, उपाहारगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. शिवाय बंद असलेल्या घडियाल गोदी आणि प्रिन्सेस डॉक इमारतींचेही संवर्धन केले जाणार आहे.
उन्नत मार्गाची वैशिष्टय़े
* सीएसएमटी-पनवेल जलद मार्गावर सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, टिळक नगर, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघर आणि पनवेल या ११ स्थानकांचा मूळ प्रस्ताव.
* कर्नाक बंदर परिसरातील सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक १८ जवळ दुमजली इमारत. पहिल्या मजल्यावर सध्या अस्तित्वात असलेली हार्बर रेल्वेची धिमी मार्गिका आणि दुसऱ्या मजल्यावर जलद मार्गिका.
* सध्या हार्बर रेल्वेवर असलेली मशीद बंदर आणि सँडहर्स्ट रोड स्थानके उन्नत जलद मार्गिकेवर आणले जातील.
* नवी मुंबई विमानतळाला या जलद मार्गाचा दुसरा टप्पा जोडणार.
सीएसएमटी-पनवेल प्रस्तावित उन्नत जलद रेल्वेमार्गाचा नकाशा व त्यावरील स्थानके.