मुंबई : पावसाळा सुरू होताच शीव-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील अशी अपेक्षा होती. मात्र, महामार्गावर काही ठराविक ठिकाणी खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र अल्पावधीतच तेथे पुन्हा खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीव-पनवेल महामार्गावरी काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. अशा ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झाल्याने या वर्षीही दुर्दशा झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अनेक रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण केले. मात्र काही उड्डाणपुलावर अद्यापही डांबरी रस्ता असल्याने तेथे वारंवार मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. सध्या मानखुर्द उड्डाणपूल, मानखुर्द टी जंक्शन, वाशी उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, नेरुळ उड्डाणपूल, बेलापूर उड्डाणपूल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच कळंबोली सर्कल परिसरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून खड्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

हेही वाचा – Best Bus : मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ बचाव अभियानाचे देखावे

हेही वाचा – बेस्टकडून ‘पे ॲण्ड पार्क’ व्यवस्था

पनवेलवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नेरुळ उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, वाशीतील दोन्ही उड्डाणपूल, मानखुर्द टी जंक्शन, मानखुर्द रेल्वे स्थानक, आणि मानखुर्द रेल्वे उड्डाणपूल येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मानखुर्द रेल्वे उड्डाणपुलालगत काही महिन्यांपूर्वी नवा पूल बांधण्यात आला. मात्र, पावसाळ्यात या उड्डाणपुलाच्या पृष्ठभागावरील सर्व डांबर निघून गेले. काही महिन्यांपूर्वी त्याची पुन्हा डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथे पुन्हा खड्डे पडले आहेत. अशीच स्थिती तुर्भे उड्डाणपुलाची आहे. हा पूल काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आला होता. सध्या येथील खड्यांमुळे मुंबईत येणाऱ्या मार्गावर आणि पनवेलला जाणाऱ्या मार्गावर दोन्ही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai potholes on shiv panvel highway mumbai print news ssb