पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे यंदाच्या पावसाळय़ातही कायम
ठाणे जिल्ह्यतील दगड खाणींवरील बंदीमुळे खडी उपलब्ध होत नसल्याने पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे भरण्याचे व रस्ते दुरुस्तीचे काम पावसाळा तोंडावर आला तरी ‘एमएमआरडीए’ला सुरू करता आलेले नाही. बाजारात मागणीच्या तुलनेत खडी उपलब्ध नसल्याने एकाही कंत्राटदाराने एमएमआरडीएच्या निविदेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता नव्याने निविदा मागविण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे, तर वेळीच काम मार्गी लागावे याकरिता मूळ किमतीच्या १५ ते २० टक्के चढय़ा दराने निविदा देण्याची वेळ एमएमआरडीवर ओढवू शकते. अर्थात इतके करूनही पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम पूर्ण होणार नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना या दोन्ही मार्गावरील खड्डय़ांना तोंड देतच प्रवास करावा लागणार आहे.
पूर्व द्रृतगती आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘एमएमआरडीए’कडे मे महिन्यात हस्तांतरित झाले. तेव्हापासून हे मार्ग अनुक्रमे पूर्व नागरी मार्ग आणि पश्चिम नागरी मार्ग या नावाने ओळखले जातात. या मार्गाची जबाबदारी आल्यानंतर एमएमआरडीएने दोन्ही रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता निविदा मागवल्या होत्या. परंतु, रस्तेकामासाठी लागणारी खडी उपलब्ध होत नसल्याने या कामात एकाही कंत्राटदाराने स्वारस्य दाखवले नाही. कामे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने घातलेली सहा महिन्यांची अटही कंत्राटदारांना नकोशी आहे, असे समजते.
पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएने २ जून रोजी या रस्त्यांच्या कामासाठी नव्याने निविदा मागवल्या. या दोन मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाकरिता एकूण ११ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे.
मान्सूनपूर्व काम पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटाची रक्कम अदा केली जाणार आहे. मात्र खडीच्या समस्येमुळे ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा १५ ते २० टक्के चढय़ा दराने हे कंत्राट दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
’ ठाणे जिल्ह्यतील दगड खाणींवर राष्ट्रीय हरित लवादाने मार्च महिन्यात बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारात पुरेशा प्रमाणात खडी उपलब्ध नाही. याचा फटका मुंबईच नव्हे तर ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांच्या कामांनाही बसतो आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी काहीही करून पावसाळापूर्वी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करू. पावसाळ्यात काम सुरू राहील हे जरी खरे असले तरी आमचा नाईलाज आहे. कारण, या रस्त्यांची जबाबदारी आमच्याकडे मे महिन्याच्या सुमारास आली. त्यामुळे निविदा देण्यास विलंब झाला. अर्थात पाऊस जेव्हा नसेल तेव्हा आम्ही जास्तीत कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– दिलीप कवठकर, सह प्रकल्प अधिकारी, एमएमआरडीए
” ११ कोटी
सहा महिन्यांच्या कामांकरिता दोन्ही मार्गावर होणारा एकूण खर्च
” ७.४३ कोटी
पश्चिम नागरी मार्गावर होणारा खर्च
” ३.४७ कोटी
पूर्व नागरी मार्गावर होणारा खर्च