मुंबई : वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड ट्रॉम्बे येथील वीज वाहिनीत बिघाड झाला आणि टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडले. जवळपास एक तासांहून अधिक वेळ खंडीत झालेल्या वीज पुरवठय़ामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले. यामुळे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणाच बंद पडल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील २०० हून अधिक लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी पावणे दहाच्या सुमारास विद्युत पुरवठय़ात तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अँटॉप हिल, दादर, लालबाग, मशीद रोड, वरळीसह आधी भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. ऐन सुट्टीच्या दिवशी वीज गायब झाल्याने नागरीकांची कामेही खोळंबली. बराच वेळ वीजही न आल्याने त्यामागील नेमके अनेकांना कारणही समजत नव्हते. या कारणांची माहिती नागरीकांना प्रसारमाध्यमांद्वारे मिळत होती.

या बिघाडाचा फटका पश्चिम व मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायर आणि सिग्नलाही बसला.  पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची सेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने या मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. अनेक लोकल बराच वेळ जागीच थांबल्या. 

सेवा सुरुळीत करण्यासाठी जोगेश्वरी येथील सब स्टेशनमधून तात्पुरता वीज पुरवठा घेण्यात आला आणि लोकल १०.४४ वाजता सुरळीत झाल्या. पश्चिम रेल्वेवरील ५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर १४० लोकल फेऱ्या उशिराने धावल्या. मध्य रेल्वेवरही ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते कल्याण मार्गावरील लोकल गाडय़ांचा वेग मंदावला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai power outage affects local train movement zws
Show comments