मुंबई : नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील एका खोलीला ६ एप्रिल रोजी सायंकाळी आग लागली. तेव्हापासून आजतागायत या वसतिगृहातील वीजप्रवाह सुरळीत झालेला नाही. त्यामुळे वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणतीही व्यवस्था करण्यात न आल्याने अखेर सोमवारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ११ मजली विस्तारित इमारतीचे नुकतेच महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र ६ एप्रिल रोजी सायंकाळी विद्यार्थी वसतिगृहातील दहाव्या मजल्यावरील एका खोलीला अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्या खोलीतील सामान जळून खाक झाले. त्यामुळे वसतिगृह असलेल्या चारही मजल्यावरील विद्युत पुरवठा खंडित झाला. या मजल्यांवर विद्युत पुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या एका छोट्याशा सभागृहात तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली. या वसतिगृहामध्ये जवळपास २८० विद्यार्थी राहत होते. त्यातील बहुतेकजण आपल्या घरी निघून गेले. जवळपास १५० विद्यार्थ्यांपैकी काहीजणांची व्यवस्था सातव्या मजल्यावरील सभागृहात, वाचन कक्षात तर काहींची व्यवस्था काॅमन रूममध्ये करण्यात आली होती. मात्र या घटनेला १० दिवस उलटले तरी रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही.

हेही वाचा : मुंबईसह, ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

घरी गेलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तर वसतिगृहाच्या एका छोट्याशा खोलीत दाटीवाटीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वीज नसल्याने व राहण्यासांठी स्वतंत्र खोली नसल्याने त्यांच्या जेवणाची गैरसोय होत होती. त्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना सकाळी आंघोळ करण्यापासून नाष्टा व जेवणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेक विद्यार्थी ऑनलाईन जेवण मागवत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अनेक गोष्टी चोरीला जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यातून सोमवारी वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात जोरदार आंदोलन केले.

हेही वाचा : राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी विद्यार्थ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी अग्निसुरक्षेच्या तपासणीसह विविध सुधारणा तातडीने करण्यात येतील. तसेच वसतिगृहातील वीज गुरूवारपर्यंत येईल, असे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”

वसतिगृहातील खोलीला लागलेल्या आगीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आला आहे. त्यावर चर्चा करून झाली असून, लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी उपहारगृहामध्ये दोन वेळचे जेवण आणि नाष्टा २५० रुपयांमध्ये उपलब्ध केले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी त्याला नकार दिल्याने याबाबत कंत्राटदारासोबत चर्चा सुरू आहे.

नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नायर दंत महाविद्यालय व रुग्णालय
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai power outage at nair hospital dental college resident doctor suffer from last 10 days mumbai print news css
Show comments