मुंबई : नागरिकांच्या हरकती-सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय (डबलडेकर) पूल बांधण्यात येणार होता. त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधीच मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सूचना-हरकती सादर झाल्या आहेत.
या सूचना-हरकतींचा विचार करत त्यानुसार पर्यायी वाहतूक मार्गात बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. चार-पाच दिवसांनंतर याबाबत निर्णय घेऊन पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी उन्नत रस्ता बांधला जात आहे. हा रस्ता प्रभादेवी पुलावरून जाणार आहे. पण हा पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएने सध्याच्या पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार सध्याचा पूल पाडून त्याजागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. या पुलातील एक स्तर स्थानिक वाहतुकीसाठी अर्थात सध्या प्रभादेवी पुलावरून जशी वाहतूक होते त्यानुसारच्या वाहतुकीसाठी असणार आहे, तर पुलाच्या वरच्या स्तरावरून पूर्व मुक्तमार्ग, अटल सेतूला येता-जाता येणार आहे. अशा या पुलाच्या कामासाठी, पूल पाडण्यासाठी एमएमआरडीएकडून मागील काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून परवानगी मागितली जात होती. त्यानुसार अखेर वाहतूक पोलिसांनी १५ एप्रिलपासून पूल बंद करण्यास परवानगी दिली. १५ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच २० महिने पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. परवानगी दिल्याने एमएमआरडीए पाडकामासाठी सज्ज झाले होते, तर वाहतूक पोलिसांनीही पर्यायी वाहतूक मार्ग आखत तयारी केली होती. पण आता मात्र १५ एप्रिलपासून प्रभादेवी पूल बंद करण्याचा निर्णय काहीसा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लवकरच वाहतुकीत बदल
पूल बंद करून पुलाचे पाडकाम आणि नवीन पुलाच्या उभारणीसाठी ७ ते १३ एप्रिलदरम्यान वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या होत्या. मोठ्या प्रमाणात सूचना-हरकती दाखल झाल्या आहेत. या सूचना-हरकतींचा योग्य तो विचार करून, त्यानुसार पर्यायी वाहतुकीत बदल करून पूल बंद करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी किमान आणखी चार-पाच दिवस लागतील. त्यामुळे चार-पाच दिवसांनंतर पूल बंद केला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनचालकांना चार-पाच दिवसांचा का होईना पण काहीसा दिलासा मिळाला आहे.