मुंबई : अतिक्रमण काढल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेत हिरवळ फुलवण्याचा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने केला आहे. प्रभादेवीतील एस. एल. मटकर मार्गावरील ३९ अनधिकृत बांधकामे हटविल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यालगत उपलब्ध झालेल्या खुल्या जागेमध्ये विविध झाडांची दोनशेपेक्षा अधिक रोपटी लावून हा मार्ग हिरवागार करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रातील प्रभादेवी परिसरात एस. एल. मटकर मार्ग हा एक प्रमुख रस्ता आहे. या मार्गावरील पदपथालगत आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना या मार्गावरून चालताना गैरसोईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या ३९ अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर प्रक्रियेनंतर जानेवारी २०२५ मध्ये अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली होती.
निष्कासन कारवाईअंती ३९ बांधकामे हटविल्यानंतर एस. एल. मटकर मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यालगत उपलब्ध झालेल्या खुल्या जागेमध्ये विविध पर्यावरणपूरक झाडांची दोनशेपेक्षा अधिक रोपटी शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यात आली आहेत. या रोपट्यांची निवड करण्यासह ती लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहकार्यदेखील घेण्यात आले आहे.
या वृक्ष लागवडीमुळे परिसरातील हिरवाई वाढण्यासह परिसर प्रदूषणमुक्त होण्यास देखील मदत होणार आहे. वृक्ष लागवडीसह या खुल्या भूखंडावर एस. एल. मटकर मार्गालगत २ मीटर रुंदीचा काँक्रीटचा पदपथ बांधण्यात आला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोठा पदपथ उपलब्ध झाला असून त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना बहरणाऱ्या हिरवाईचाही अनुभव घेता येणार आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर उपलब्ध होणारी जागा कधी विविध उपक्रमांसाठी वापरण्यात येते. कधीकधी त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होते. तसे होऊ नये म्हणून अतिक्रमण निर्मूलनानंतर उपलब्ध झालेल्या जागेचा जी दक्षिण विभागाने पर्यावरणपूरक उपयोग केला आहे. ज्यामुळे एकेकाळी अतिक्रमणाने व्याप्त असलेल्या जागेवर तब्बल दोनशे पेक्षा अधिक झाडांची रोपे लावून सुंदर अशी हिरवळ फुलविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही झाडे लावली
याठिकाणी लावण्यात आलेल्या रोपट्यांमध्ये सुपारी, अरेका पाम, ड्रेसिना, मुसांडा, पेडीलॅन्थस, टॅबरनामोंटाना, ॲकालीफा, लॅनटेना सारख्या विविध पर्यावरणपूरक व शोभीवंत रोपांचा समावेश आहे. ‘अरेका पाम’ या झाडाच्या आगळ्या वैशिष्ट्यांबाबत उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा वृक्ष हवेतील वायू प्रदूषके शोषून घेतो. तसेच या झाडांवर फुलपाखरेदेखील आकर्षित होतात.