मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. यामुळे कमाला तापमानात अधूनमधून घट होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. पश्चिमी प्रकोपामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळीच्या वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. तर काही भागात पूर्वी मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मुंबईसह नवी मुंबईत हलक्या सरी

बोरिवली, दहिसर, खोपोली भागात सोमवारी सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या. तसेच वाशी आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

पुढील ३६-४८ तासांत पावसाची शक्यता

मुंबईत पुढील ३६ ते ४८ तासांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल.

संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण

मुंबईत पावसाची शक्यता असल्याने मंगळवारी संपूर्ण दिवस वातावरण ढगाळ राहील. यामुळे मुंबईकरांना काहीसा उकाड्याचा सामना करावा लागेल.

पूर्वमोसमी पावसाची शक्यता कुठे ?

कोकणात १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी भागांतही हलका पाऊस होणार आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यांतही चार-पाच दिवस पावसाळी स्थिती असणार आहे.

पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस यात फरक काय ?

  • पूर्वमोसमी पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
  • पूर्वमोसमी पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस पडतो. मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
  • पूर्वमोसमी पाऊस गडगडाटी, आणि रौद्र स्वरुपाचा असतो. मोसमी पाऊस संततधार, संथ आणि शांतपणे येतो.