मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या महानिविदेच्या कामांपैकी केवळ ११ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. एकूण ३९७ किमी लांबीच्या एकूण ९१० रस्त्यांच्या कामासाठी गेल्यावर्षी कार्यादेश देण्यात आले होते. त्यापैकी शहर भागातील कंत्राट वादात सापडले असून पूर्व व पश्चिम उपनगरातील कामे सुरू आहेत. मात्र त्यातही केवळ ११ रस्त्यांची कामेच पूर्ण झाली असल्याचे पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात आणखी २०९ किमीच्या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.
येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. तब्बल ६,०७८ कोटींच्या कामांसाठी महानिविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र ही रस्त्यांची कामे अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. तसेच शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. गेले वर्षभर शहर भागातील रस्त्यांची कामे वादात व नंतर न्यायालयीन खटल्यात अडकली होती. त्यामुळे शहर भागातील एकाही रस्त्याचे काम सुरूही झालेले नाही. मात्र पूर्व व पश्चिम उपनगरातील अन्य चार कंत्राटदारांच्या कामाचा वेगही अतिशय कमी आहे. त्यामुळे या महानिविवदेतील केवळ ११ रस्त्यांची कामेच पूर्ण होऊ शकली आहेत, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
दरम्यान, महानिविदेतील आधीचीच कामे पूर्ण झालेली नसताना येत्या आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये आणखी २०९ किमीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंंक्रिटीकरण करण्यात येणार असून त्याकरीता निविदा मागवण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
आतापर्यत १२२४ किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २००० किमीचे रस्ते असून त्यापैकी आतापर्यंत १२२४ किमी लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. २०२३-२४ या वर्षात आधीच्या कंत्राटातील २५२ किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
या प्रमुख रस्त्यांची सुधारणा झाली
शहर भागातील बी जी खेर मार्ग, पश्चिम उपनगरातील जयराज नगर रोज, मरीना एन्क्लेव्ह रोड, चित्तरंजन रोड, पूर्व उपनगरातील काजूपाडा पाईपलाईन रोड यांची कामे पूर्ण झाली आहेत.
या प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेणार
शहर भागातील वीर नरिमन रोड, कुपरेज रोड, पश्चिम उपनगरातील दयालदास रोड, लिंक रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, पूर्व उपनगरात बाजीप्रभू देशपांडे मार्ग, छेडी नगर रोड क्रमांक१, पी सोमाणी मार्ग, रहेजा विहा रोड या रस्त्याची सुधारणा येत्या वर्षात करण्यात येणार आहे.
मुंबईतील एकूण रस्ते ….. सुमारे २००० किमी
सन २०२२ पूर्वी मुंबईत साधारण ९९० कि.मी. रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झालेले आहे. आतापर्यंत १२२४ किमी कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले.
२०२३-२४ मध्ये ३९७ किमी रस्त्यांसाठी कंत्राट दिले. २०२४-२५ मध्ये आणखी २०९ किमीच्या कामांसाठी कंत्राट देण्यात येणार आहे.