मुंबई : म्हाडा भवनातील म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून एका रहिवाशाने महिला कर्मचार्यास अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी म्हाडा कर्मचार्यांनी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज (सोमवार, ३० डिसेंबर) कर्मचारी कोणतीही कामे करणार नसल्याने म्हाडा रहिवाशी, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात गुरुवारी दुपारी काही रहिवासी आपली समस्या घेऊन आले होते. आपल्या समस्येवर सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी हे रहिवासी करीत होती. उपाध्यक्ष आणि अन्य अधिकारी एका महत्त्वाच्या बैठकीत व्यग्र होते. त्याच वेळी एका रहिवाशाने गोंधळ घातला. पुढे गोंधळ वाढत गेला आणि या रहिवाशाने आरडाओरड करत अधिकारी, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली, असा आरोप म्हाडाच्या कर्मचार्यांनी केला. या रहिवाशाने म्हाडा उपाध्यक्षांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचार्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याचाही आरोप आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जयस्वाल यांनी याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला कर्मचार्याने गुरुवारी खेरवाडी पोलीस ठाण्यात संबंधित रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. असे असताना आता म्हाडा कर्मचारी यावरुन आक्रमक झाले आहेत. म्हाडा गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, ग्रुॅज्युएट इंजिनीयर्स असोसिएशन ऑफ म्हाडा या तीन संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासाठी सोमवार, ३० डिसेंबर रोजी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.