मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना रविवारी पहाटे ( ७ जुलै रोजी ) घडली होती. या घटनेत कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मंगळवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली. दरम्यान, ज्यावेळी अपघात झाला, त्यापूर्वी मिहीर शाहने मद्य प्राशन केले होतं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याने पबमध्ये प्रवेश करण्यासाठी खोटं ओळखपत्र वापरल्याचं पुढे आलं आहे.
मिहीर शाहने पबमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या ओळखपत्राचा वापर केला, त्यावर त्याचे वय २७ वर्ष असल्याची नोंद होती, त्यामुळे त्याला पबमध्ये प्रवेश देण्यात आला, असा दावा पबच्या व्यवस्थापनाने केला आहे. मात्र, अधिकृत कागदपत्रांनुसार त्याचे वय २३ वर्ष आहे. एनडीएटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा – अपघातानंतर मिहीर शाहकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न? पोलिसांना चकवा देण्याकरता शक्कल!
पबवर बीएमसीची कारवाई
दरम्यान, मिहीर शाहने अपघातापूर्वी ज्या पबमध्ये मद्यप्राशन केले, त्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी बीएमसीने या पबच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत हे अनाधिकृत बांधकाम पाडलं आहे.
तीन दिवस फरार राहिल्यानंतर मिहीर शाहला अटक
अपघातानंतर तीन दिवस फरार असलेल्या मिहिर शाहला मंगळवारी अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. तीन दिवसांनंतर त्याला विरार येथून अटक करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा या महिलेला रविवारी सकाळी ५.२५ वाजता धडक दिली होती. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटर दूर त्यांना फरफटत नेले होतं. याप्रकरणी मिहीरचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने राजेश शाह यांना जामीन मंजूर केला. तर चालकाला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.