डीसी विद्युतप्रवाहावरील शेवटच्या गाडीला मुंबईकरांचा निरोप; प्रत्येक स्थानकावर वाद्यांच्या गजरात स्वागत
गेली ९१ वर्षे म्हणजेच १९२५पासून मुंबईकरांची सेवा इमानेइतबारे करणाऱ्या डीसी विद्युतप्रवाहाला रेल्वे अधिकाऱ्यांनी वाजतगाजत निरोप दिला. विद्युतप्रवाहातील बदलाचा कोणताही दृश्य फरक दिसत नसल्याने बहुतांश मुंबईकर मात्र या सोहळ्यापासून अलिप्तच राहिले. डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी ही शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता कुल्र्याहून निघणार होती. पण ही गाडीदेखील भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर परंपरेप्रमाणे सात मिनिटे उशिरा निघाली.
वयोमर्यादा उलटून गेलेल्या आणि मुंबईकरांच्या जीवाला धोका असलेल्या या गाडीला तिच्या डीसी विद्युतप्रवाहावरील शेवटच्या प्रवासासाठी सानपाडा कारशेडमध्ये फुलांच्या माळा, फुगे यांनी सजवण्यात आले. ही गाडी रात्री ११.३० वाजता कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या वाद्यवृंदाने वाजतगाजत या गाडीचे स्वागत केले. इतर दिवशी हजारो मुंबईकर ज्या गाडीतून घुसमटत प्रवास करतात, त्या गाडीतून खासदार आणि रेल्वे अधिकारीही घाम पुसत बसले.
ढोल बजने लगा
ही गाडी रात्री ११.३० वाजता कुल्र्याहून निघणे अपेक्षित होते. पण रेल्वेच्या नेहमीच्या दिरंगाईबरोबरच सोहळ्याच्या निमित्ताने गाडीने ११.३७ वाजता डीसी विद्युतप्रवाहावरील अखेरचा प्रवास सुरू केला. कुर्ला ते मुंबईदरम्यानच्या प्रत्येक स्थानकावर गाडीच्या स्वागतासाठी वाद्यवृंद, रेल्वेचे कलावंत हजर होते. या कलावंतांनी विविध स्थानकांवर ढोल, ताशे, कीबोर्ड व इतर वाद्यांच्या गजरात कुठे भांगडा, तर कुठे कोळीनृत्य असे कलाप्रकार सादर करत या गाडीचे स्वागत केले.
सर्वसामान्यांना देणेघेणे नाहीच
या सर्व सोहळ्यात सर्वसामान्य मुंबईकरांनी मात्र फारसा उत्साह दाखवला नाही. नाही म्हणायला आयपीएलचा सामना बघून घरी परतण्यासाठी निघालेल्या अनेकांनी ढोलताशांचा आवाज आणि हा गोंधळ बघून सीएसटीला गर्दी केली होती. काही उत्साही तरुणांनी तर गाडीच्या पुढे रेल्वेरुळांवर उतरत सेल्फी काढण्याची हौसही भागवली. पण त्यापुढे कोणालाही डीसी-एसी परिवर्तनाबाबत काहीच रस नसल्याचे दिसत होते. याबाबत मुंबई छत्रपती शिवाजी स्थानकात उपस्थित असलेल्या काही प्रवाशांना विचारले असता, आमच्या डोक्यावरून जाणाऱ्या तारांमध्ये १५०० वोल्ट डीसी विद्युतप्रवाह आहे की, २५ हजार वोल्ट एसी विद्युतप्रवाह आहे, याच्याशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही. रेल्वेने सेवा वक्तशीरपणे चालवाव्यात, एवढीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
जुन्या लोकल अद्याप तरी हद्दपार नाहीतच!
* डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्यानंतर हार्बरकर प्रवासी दुसऱ्या दिवसापासून नव्या आणि अधिक आरामदायक लोकलची अपेक्षा करत असतील, तर अपेक्षाभंग होणार आहे.
* हार्बर मार्गावरील या जुन्या गाडय़ांच्या विद्युत यंत्रणेत बदल करून त्या डीसी-एसी अशा दोन्ही विद्युत प्रवाहांवर चालण्यासाठी सक्षम बनवल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर जुन्या झालेल्या सिमेन्स गाडय़ा मध्य रेल्वेच्या ताब्यात येत नाहीत, तोपर्यंत या जुन्या लोकल प्रवाशांच्या सेवेत असतील.
* त्या गाडय़ा आल्यानंतरही त्यांचा उपयोग सर्वप्रथम हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यासाठी केला जाईल. त्यामुळे पुढील वर्ष-दीड वर्ष या जुन्या गाडय़ांची संगत हार्बरकरांना लाभणार आहे.
दहा हजारांची तिकिटे विक्रीविना पडून!
शेवटची डीसी लोकल, असे भावनिक आवाहन करून या गाडीचे तिकीट १० हजार रुपयांना विकण्याच्या मध्य रेल्वेच्या उपक्रमाकडे मात्र मुंबईकरांनी ढुंकूनही पाहिले नाही. इतर सरकारी आस्थापनांमधील कर्मचारी स्वेच्छेने आपले एका दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून देत असताना रेल्वेने मात्र प्रवाशांच्या खिशातून पैसे काढण्याची क्लृप्ती वापरल्याबद्दल प्रवासी नाराज होते. खासदार राहुल शेवाळे व खासदार अरविंद सावंत यांना या दहा हजारांच्या तिकिटाबाबत विचारले असता, आपण दुष्काळग्रस्तांसाठी विविध माध्यमांतून मदत करत असून त्यासाठी रेल्वेचे दहा हजारांचे तिकीट विकत घेतले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.