New Cyber Fraud: सायबर चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबतची जागृती मुंबई सायबर सेल आणि माध्यमात आलेल्या बातम्यांमधून होत असते. तरीही रोजच्या रोज लोक अशाप्रकारच्या स्कॅमला बळी पडतच आहेत. विशेष म्हणजे सायबर स्कॅमला बळी पडणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ लोकांचे अधिक प्रमाण आहे. मुंबईतील कुलाबा येथे राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याची नुकतीच फसवणूक करण्यात आली. पीडित व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुख्य इलेक्ट्रिक अभियंता म्हणून काम करते.
कशी झाली फसवणूक?
५९ वर्षीय अधिकाऱ्याला १६ सप्टेंबर रोजी मोबाइलवर एक व्हॉईस मेसेज आला. या मेसेजमध्ये सांगितले गेले की, तुमचा मोबाइल नंबर दोन तासात ब्लॉक होणार आहे. मोबाइलच्या किपॅडवर शून्य दाबल्यास पुढील माहिती मिळेल. पीडित व्यक्तीने शून्य दाबताच एक व्हिडीओ कॉल सुरू झाला आणि पलीकडे असलेल्या व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तुमचे नाव मनी लाँडरिंग प्रकरणात गुंतले असल्याचे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. ज्या बँक खात्यातून घोटाळा झाला, त्याच्याशी तुमचा नंबर जोडला असल्याचेही सायबर चोरट्यांनी पीडित अधिकाऱ्याला सांगितले.
हे वाचा >> सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?
चोरट्यांनी सांगितलेली बाब रेल्वे अधिकाऱ्याने फेटाळली आणि त्याच्याकडे दुसरा कोणताही मोबाइल नंबर नसल्याचे सांगितले. मात्र तुमच्या नावाचा वापर करून मोबाइल नंबर घेण्यात आला आहे आणि त्या माध्यमातून जेटएअरवेजचे माजी प्रमुख नरेश गोयल यांच्याशी संबंधित २४७ बँक खात्यातून ५८ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.
रेल्वे अधिकारी २० तास नजरकैदेत
यानंतर रेल्वे अधिकाऱ्याला दुपारी दोन वाजता पुन्हा एक फोन आला. यावेळी सायबर चोरट्यांनी रेल्वे अधिकाऱ्याकडून त्याची वैयक्तिक माहिती घेतली. कुटुंबाची पार्श्वभूमी आणि आर्थिक तपशीलही जाणून घेतला. यानंतर पीडित रेल्वे अधिकाऱ्याला सांगितले गेले की, त्याला थोड्याच वेळात ऑनलाईन न्यायालयात हजर केले जाणार आहे, तिथे न्यायाधीश त्याच्या प्रकरणाचा निकाल देतील. यानंतर पीडित व्यक्तीला नजरकैदेत ठेवणअयात आले. यादरम्यान व्हिडीओ कॉल सुरूच होता. जो दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता संपला.
हे ही वाचा >> Cyber scam: सायबर चोरट्यांनी हद्दच केली, मुंबईतील वकील महिलेला चौकशीच्या नावाखाली विवस्त्र होण्यास भाग पाडलं
यानंतर बोगस न्यायाधीशाने पीडित व्यक्तीला एक बँक खात्याचा क्रमांक दिला. तसेच या बँक खात्यावर नऊ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. पीडित व्यक्तीने नऊ लाख रुपये जमाही केले. पण त्यानंतर त्याची फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.