मुंबई : सायबर साक्षरता वाढवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत एक लाखाहून अधिक व्यक्तींना सायबर साक्षर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सायबर फसवणुकीचा प्रकार, त्यांची फसवणुकीची पद्धत, त्यापासून कसे वाचता येईल, फसवणूक झाल्यास काय करावे, या माहितीचे संकलन करून एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. ही परीक्षा देणाऱ्या मुंबई व परिसरातील ४० महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांचा सायबर व कायदा साक्षरता संघ स्थापन करण्यात आला होता. त्यांच्या माध्यमातून एक लाख व्यक्तींना सायबर साक्षर करण्यात आले आहेत.
माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारासोबत सायबर फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सायबर फसवणूक व कायद्यातीन बदलांबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून सायबर व कायदा साक्षरता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सायबर व कायदा साक्षरता संघ स्थापन करण्यात आला. त्यात मुंबई व परिसरातील ४० महाविद्यालयांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे धडे घेतले. त्यासाठी पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.
विविध विषयांची माहिती
सायबर साक्षरतेमध्ये विविध सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात येते. त्यात लिंकद्वारे सायबर फसवणूक, केवायसी, सेक्सटॉर्शन, समाज माध्यमांवरील फसवणूक अशा विविध फसवणुकीची माहिती देण्यात आली आहे. पुस्तिकेच्या दुसऱ्या भागात त्याबाबतच्या उपायांची माहिती देण्यात आली आहे. त्यात सायबर फसवणूक कशी टाळता येईल, मोबाइल अॅप्लिकेशन सुरक्षा, फसणुकीचे बळी ठरल्यास काय करता येईल, अशी माहिती आहे.