मानखुर्द स्थानकाजवळील घटना
आत्महत्येसाठी आलेल्या तरुणाचे प्राण सतर्क मोटरमनमुळे वाचले. मानखुर्द स्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेत मोटरमननेच तरुणाची समजूत काढली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला बाजूला करण्यात आले.
मध्य रेल्वेचे मोटरमन नरेंद्र तळेकर हे पनवेल ते सीएसएमटी या उपनगरी रेल्वेवर कार्यरत होते. सकाळी १०.४९ वाजता ही गाडी सुटली आणि वाशी ते मानखुर्ददरम्यान आली असता तळेकर यांना दूरवर काही हालचाली दिसल्या. रेल्वे ताशी ७० ते ८० च्या वेगाने जात होती. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला एक तरुण रुळावर बसल्याचे तळेकर यांना दिसले. गाडी जवळ येत असल्याचे पाहताच त्याने रुळावर मान ठेवली. हे पाहताच मोटरमन तळेकर यांनी त्वरित गाडीमधील आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवली. रेल्वेमधून उतरून त्यांनी आत्महत्येसाठी आलेल्या त्या तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. स्थानिकांनीही ही घटना पाहताच तेही तरुणाची समजूत काढण्यासाठी पुढे आले. दहा मिनिटे समजूत काढल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली.
रुळावर काही तरी हालचाली होत असल्याचे दिसले. जवळ जाताच एक १८ वर्षीय तरुण गाडीसमोर आत्महत्येसाठी आल्याने रेल्वे त्वरित थांबवली. त्यामुळे त्याचे प्राण बचावले. त्याची समजूत काढली. शिवाय रेल्वेच्या नियंत्रण कक्ष व सुरक्षा दलालाही याची माहिती दिली. स्थानिकांनी त्याला बाजूला केल्यानंतर उपनगरी रेल्वे पुढे सीएसएमटीला नेण्यात आली. – नरेंद्र तळेकर, मोटरमन