मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दादर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ट्वीटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा जोर धरलेला असतानाच रेल्वे वाहतूक उशीराने होत असल्याने कामावर जाणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने ट्वीटरवरुन सिग्नल यंत्रणेसंदर्भातील गोंधळाबद्दल माहिती दिली आहे. “दादर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ट्रेन उशीराने धावत आहेत,” असं रेल्वेनं म्हटलं आहे. “कर्मचारी आणि अधिकारी हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम करत असून लवकरच तो दूर केला जाईल,” असंही रेल्वेनं म्हटलं आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
साडेआठ वाजता मध्य रेल्वेने आणखीन एक ट्वीट करुन बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती दिली. “दादर स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे,” असं ट्वीट मध्य रेल्वेनं केलं होतं. मात्र त्यापुढे, “मोठ्या प्रमाणात सकाळी ट्रेन्सची वाहतूक असल्याने ट्रेन उशीराने धावत आहेत,” असंही मध्य रेल्वेनं नमूद केलं आहे.
या गोंधळामुळे सकाळीच मुंबईत ऑफिसला जाणाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सोशल मीडियाबरोबरच एम इंडिकेटरवरील चॅट बॉक्समध्येही दिसून येत आहे.