मुंबई : हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मंगळवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली. तसा पाऊसही मंगळवारी सुट्टीवर गेला. सकाळपासून मुसळधार तर नाहीच तुरळक ठिकाणी एखादी सर रिपरिपली. अचानक आयत्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत नागरिकांनी नजीकचे निसर्गपर्यटन स्थळ आणि मॉलकडे धाव घेतली. मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्याला रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले. कोकणात अनेक नद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्या तर मुंबई, ठाण्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नामांतरासाठी केंद्राला शिफारस; मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

या परिस्थितीतून सावरताना प्रशासनाची तारांबळ उडाली. सोमवारी रात्री मुंबई, ठाणे, नवी मुंबईत, कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. प्रत्यक्षात हा इशारा मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत होता. त्यानंतर मुंबई आणि परिसरात दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. रात्रभर अनेक भागांत, विशेषत मुंबईच्या उपनगरांमध्ये पाऊस झाला मुसळधार म्हणावा इतपत पावसाची सरासरी नोंद विभागाच्या दस्तावेजात झाली. मात्र विभागाच्या इशाऱ्याची धास्ती घेऊन प्रशासनाने सोमवारी रात्री उशीरा शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुट्टीचे परिपत्रक निघाले आणि एखादी साथ पसरावी तसे पावसाचा अंदाज असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये पसरले. त्यासरशी स्थानिक प्रशासनांनी सोमवारी रात्री मंगळवारची सुट्टी जाहीर करण्यास सुरूवात केली. सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा नसतानाही पुण्यातही सुट्टी जाहीर करण्यात आली. मंगळवारी सकाळपासून मात्र पावसाने दडी मारली. अनेक भागांत चक्क ऊन पडले. आयत्या मिळालेल्या सुट्टीमुळे अध्यापनाचा आणि कामकाजाचा एक दिवस वाया गेला. मात्र नागरिकांची विशेषत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पावले सुट्टीचा मजा घेण्यासाठी छोटे धबधबे, जवळपासचे डोंगर, गड-किल्ले यांच्याकडे वळली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain citizens rushed to the nearby tourist spots and mall on holiday zws
Show comments