शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी १५ ते २० मिनिटं लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, आता विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत मुक्काम ठोकला आहे. गुरुवारपासून बरसत असलेल्या पावसाचा शनिवारनंतर जोर वाढला. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पावसाचा जोर वाढला.

संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड येथे पुढील ३ ते ४ तासाच्या दरम्यान तीव्र ते अति तीव्र पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात पुढील पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट

१९ ते २3 जुलै रोजी हवामानविभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.

सोमवारी सकाळी काही वेळासाठी लोकल सेवा थांबवण्यात आली. त्यानंतर मंदगतीने लोकल गाड्या धावत आहेत. तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईसह चार ते पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.