Mumbai Rain मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाने मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ऑफिस संपवून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ट्रेन्स एका जागी ४० ते ५० मिनिटं थांबल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. संध्याकाळनंतर पावसाचा ( Mumbai Rain ) जोर वाढला. त्याचाच परिणाम लोकल सेवेवे झाला आहे.
लोकल सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने
मुसळधार पावसामुळे ( Mumbai Rain ) मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटांनी विस्कळीत झाली आहे. तर, पश्चिम मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल ५ ते ६ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. तर, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नद्यांचं स्वरुप आलं आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव काळातही तुरळक पाऊस झाला. मात्र आज अचानक पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या. तर, संध्याकाळनंतर या रिमझिम सरींनी मुसळधार पावसाला सुरुवात केली. त्यामुळे कार्यालयीन कामं संपवून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वे आणि पश्चिम मार्गावरही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी पाहायला मिळते. तर काहीजणांनी कार्यालयातच आसरा घेतला आहे. तर लोकल सेवा विस्कळीत झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी आहे.
नवी मुंबईतही तुफान पाऊस
नवी मुंबईतही तुफान पाऊस पडतो आहे. नागरिकांची या पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या, संध्याकाळनंतर पाऊस वाढला आहे. तसंच मुंबईतल्या पावसाचा परिणाम हा विमानसेवेवरही झाला आहे. सकाळी मुंबईत कामानिमित्त आलेले लोक आता घरी जाताना ट्रेन्समध्ये अडकून पडले आहेत. कारण लोकलसेवेचा खोळंबा झाला आहे.
मुंबईतल्या उपनगरांत अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरवली, दहिसर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे त्याच दरम्यान अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. मुसळधार पाऊस पडल्याने अंधेरी सबवे जो पूर्व पश्चिमेला जाणारा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे वाहतूक कोंडीही होताना दिसली. नागरिकांना घरातून बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आले आहे