मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंदमाता, अंधेरी, सायन या परिसरात पाऊस झाल्यानंतर नेहमीच पाणी साचतं. दरम्यान मालाड सबवेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले दोघेही स्कॉर्पिओ गाडीत प्रवास करत होते. ही गाडी मालाड सबवेला पाण्यात अडकली होती. गाडीत अडकल्याने गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. सहा तासांनी काचा फोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दोघांचीही ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती, तसंच रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली. दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. तसंच तब्बल 16 तासांनंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदल रस्त्यावर उतरलं आहे.