Heavy Rain in Mumbai: सोमवारी दिवसभर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह लोकल गाड्यांच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास ८०० गाड्या रद्द केल्यामुळे लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर उशीराने झाल्याचं दिसून आलं. मंगळावारी ९ जुलै रोजीदेखील मुंबईत अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास पावसानं विश्रांती घेतल्यामुळे लोकस सेवा सुरळीत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, तरीदेखील मध्य रेल्वेकडून गरज असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता प्रवाशांनी अपरिहार्यतेशिवाय प्रवास करणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे”, असं मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सकाळच्या सुमारास CSMT कडून निघणाऱ्या मेल उशीराने

दरम्यान, सकाळी ७ च्या सुमारास मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पाणी साचल्यामुळे तिथून निघणाऱ्या सर्व मेल व एक्स्प्रेस गाड्या उशीराने धावत असल्याची घोषणा मध्य रेल्वेवरील स्थानकांवर करण्यात येत होती. तसेच, काही रेल्वेगाड्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला.

मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Video : किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

मुंबई-ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

दरम्यान, मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पावसासाठीचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे या भागातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला निर्णय घेम्यात आला आहे. याशिवाय, मुंबई विद्यापीठाकडूनही मंगळवारी ९ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रेड अलर्टमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितलं आहे.

मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत १६७ मिमी पाऊस

पुणे हवामान विभागाचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये मुंबईतील पावसाच्या स्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “९ जुलै रोजी सकाळी ६ च्या सुमारास मुंबईत काहीशी विश्रांती घेऊन पाऊस झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात फारसा पाऊस अपेक्षित नाही. रात्रभरही फारसा पाऊस पडलेला नाही. आत्तापर्यंत मुंबईत एकूण १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे”, अशी माहिती या पोस्टमध्ये होसाळीकर यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain update central railway appeals travel if necessary on local train pmw
Show comments