रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र मुंबई महापालिका, राज्य सरकार, रेल्वे विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आणि पाऊस कमी झाल्यावर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन मुंबईसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी शहर तुंबण्याचं कारण सांगितलं, तसेच आगामी काळात आपण या स्थितीवर कशी मात करणार? पालिका आणि राज्य सरकारने कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या आहेत याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. तसेच सखल भागात पालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवले होते. त्या पंपांनी त्यांचं काम केल्यामुळे आता पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. हार्बर रेल्वे सेवा नुककीच सुरू झाली असून मध्य रेल्वे पूर्वपदावर आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस खोळंबली होती ती आता मुंबईत दाखल झाली आहे. पालिका प्रशासन, रेल्वे विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफची पथकं असे सर्व मिळून काम करत आहेत. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेलाच आव्हान मिळालं. जितकं पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे त्याहून जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. मात्र आता स्थिती पूर्वपदावर आली आहे.

हे ही वाचा >> सहा तासांच्या पावसांत मुंबईची तुंबई; दुबई-न्यूयॉर्कची उदाहरणं देत मुनगंटीवारांकडून महापालिकेचा बचाव

पूरस्थितीवर मात कशी करणार?

एकनाथ शिंदे म्हणाले, पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आपण मोगरा पंपिंग स्टेशन, माहुल पंपिंग स्टेशन सुरू करत आहोत. यासह मिठी आणि पोईसर नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवायची आहे. या भागात अतिक्रमणं वाढली होती, यावर आपण कारवाई केली आहे. यासह नद्यांचं आणि नाल्यांचं रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. आपण लवकरच ही कामं हाती घेऊ. पाऊस पडल्यानंतर सर्व पाणी नाल्यावाटे समुद्रात जातं. त्यामुळे या नाल्यांचं रुंदीकरण करणार आहोत. तसेच आपण ठिकठिकाणी पंप आणि फ्लड गेट बसवणार आहोत. जेणेकरून आपण शहरातील पाणी समुद्रात फेकू शकतो. मात्र या फ्लडगेटमुळे समुद्रातील पाणी शहरात घुसणार नाही, अगदी भरतीच्या काळातही हे पाणी शहरात घुसणार नाही. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain update eknath shinde disclosed reason waterlogging in city explains how bmc overcome situation asc
Show comments