मुंबईकरांना गेल्या दोन दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत दिली होती. मात्र, आज सकाळपासून पुन्हा एकदा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या चार तासांत मुंबईत मुसळधार पाऊस झाला असून आज संध्याकाळपर्यंत मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून झालेल्या पावसामुळे लोकल सेवेवर काहीसा परिणाम झाला आहे. यासंदर्भात दुपारी ३ वाजेची काय स्थिती आहे, यासंदर्भात मध्य रेल्वेकडून विशेष अपडेट देण्यात आली आहे.
कुर्ला स्थानकात हार्बर लाईनवर पाणी तुंबलं!
कुर्ला स्थानकात हार्बर लाईनवर पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वडाळ्याहून मानखुर्दच्या दिशेने जाणारी डाऊन मार्गावरची वाहतूक दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून थांबवण्यात आली होती. दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी ही वाहतूक हळूहळू पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे या लाईनवरील लोकल २० ते ३० मिनीट उशीराने धावत आहेत. याव्यतिरिक्त इतर लाईनवर वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेनं ट्विटरवर दिली आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा/गोरेगाव या लाईनवरची वाहतूक २० ते ३० मिनीट उशीराने चालू आहे.
ट्रान्स हार्बरची काय स्थिती?
मुंबई ट्रान्सहार्बर लाईनवर लोकल वाहतूक व्यवस्थित चालू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. याशिवाय, बेलापूर/नेरूळ ते खारकोपर लाईनवरही रेल्वेची वाहतूक व्यवस्थित चालू आहे.
पश्चिम रेल्वेनंही वेस्टर्न लाईनवर दुपारी ३ च्या सुमारास वाहतूक व्यवस्थित चालू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बेस्ट बसचे मार्ग बदलले
दरम्यान, सकाळपासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबल्याची स्थिती पाहायला मिळाली. शीव रस्ता मार्ग क्रमांक २४ येथे पावसाचे पाणी साचल्यामुळे शीव सर्कल ते शीव स्थानक सिग्नलदरम्यान नियोजित मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या बसमार्ग क्रमांक ७, २२, २५, १७६, ३०२, ३१२, ३४१, ४११, ४६३ या बसगाड्या राणी लक्ष्मीबाई चौक, रस्ता मार्ग क्रमांक ३ मार्गे वळवण्यात आल्या आहेत. अंधेरी भुयारी मार्ग परिसरात ३ फूट पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरातील वाहतूक एस. व्ही. रोडवरून वळविण्यात आली आहे.