मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

केरळातून पुढे सरकलेला मान्सून वायूवेगानं आधी महाराष्ट्रात तर आज एक दिवस आधी मुंबईत दाखल झाला. या पार्श्वभूमीवर बुधवारीपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. हवामान खात्याचा अंदाजावर पावसाने शिक्कामोर्तब केलं. मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी, चुनाभट्टी ते सायन आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे वाहतूक १०:२० वाजेपासून, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक ११:१० वाजेपासून थांबवण्यात आली होती. ठाणे ते कर्जत/कसारा आणि मानखुर्द ते पनवेल लोकल वाहतूक सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि बीएसयू (उरण) रेल्वे मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

Maharashtra: Railway tracks submerged between Sion railway station & GTB Nagar railway station due to heavy rainfall in Mumbai.

Mumbai Local train services b/w Kurla & CSMT have been halted, as a precautionary measure; services to resume as soon as the water recedes.#Monsoon pic.twitter.com/YUaETnmv7z

— ANI (@ANI) June 9, 2021

दरम्यान, अद्याप रुळांवर पावसाचे पाणी असल्याने हार्बर मार्गावरील सेवा मानखुर्द ते पनवेल दरम्यान सुरु असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हार्बरमार्गावरील पुढील वाहतूक ठप्प राहणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार…

पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते असनसोल विशेष रेल्वे (०२३६२) दोन वाजून ३० मिनिटांनी धावणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर विशेष रेल्वेगाडी (०२५९८) ३ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

Story img Loader