मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खोळंबली आहे. मंगळवार सकाळपासून पावसाच्या दमदार हजेरीने मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली असून अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. मंगळवार सकाळपासून पावसाने झोडपले असून पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईतील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीची नेमकी परिस्थिती काय त्याचा घेतलेला हा आढावा….

रेल्वे
मुंबईतील लोकल ट्रेन म्हणजे लाईफलाईनच. मुसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेवर परळ- कुर्लादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. तर पश्चिम रेल्वेवर एल्फिन्स्टन ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही बंद आहे. तर हार्बर रेल्वेवरील वाहतूकही बंद आहे. तिन्ही मार्ग बंद असल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत असून रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे.

 

रस्ते
मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा महापालिकेतर्फे दरवर्षी केला जातो. मात्र मुंबई महापालिका यंदादेखील तोंडघशी पडली. दादर, माटुंगा, खार, वांद्रे, अंधेरी,पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रूझ येथे वाहतूक संथगतीने सुरु आहे. दादर टीटी, चर्चगेट जंक्शन येथेही वाहतूक मंदावली आहे. पाण्यात अडकला असाल तर १०० क्रमांकावर किंवा ट्विटरवर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

हवाई वाहतूक
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपाठोपाठ हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टेक ऑफ आणि लँडिग किमान १२ ते १५ मिनिटे उशीराने सुरु असल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईतील पावसाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी क्लिक करा