Mumbai Rains Update: मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई- विरार या भागांमध्ये कालपासून रेकॉर्डब्रेकिंग पाऊस सुरु आहे. काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लगतच्याभागात तब्बल १०२ mm पावसाची नोंद झाली. ठाणे येथे १२१ मिमी, कर्जतमध्ये २९२ मिमी, कल्याणमध्ये १४१ मिमी तर नेरळमध्ये १७१ मिमी पाऊस पडला आहे. एकीकडे पावसात रद्द झालेल्या लोकल ट्रेन व पाणी साचण्याच्या घटनांमुळे चिंताग्रस्त असणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव मुसळधार पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावातील पाणी भरुन वाहत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरण क्षेत्रांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर भरपावासात पाणी टंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण दोन दिवसांच्या तुफान पावसानंतर आता काही अंशी तर पाणी टंचाईचा प्रश्न कमी होऊ शकतो.
Video: मुंबईकरांसाठी खुशखबर
हे ही वाचा<< पुढील दोन आठवड्यात ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज! मुंबईसह राज्यातील पावसाचे रूप कसे असेल?
दरम्यान, आजसुद्धा मुंबई व लगतच्या भागांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मध्ये रेल्वेच्या माहितीनुसार तूर्तास तरी ट्रेन सुरळीत सुरु आहेत मात्र पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती बदलू शकते. कालच्या पावसात सकाळपासूनच लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आजही मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच खबरदारी म्हणून शाळा- कॉलेजला सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास आज समुद्रात भरती येणार आहे.