मुंबई : निम्म्याहून अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर शनिवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पूर्वमोसमी सरींमध्ये मुंबई महापालिकेचे सर्व दावे वाहून गेले. मुंबईसह ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली.
मुंबई, नवी मुंबई, ठाण्याच्या बहुतांश भागांत शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. सकाळपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने दुपारी काहिशी विश्रांती घेतली. मात्र, सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावत पावसाने मुंबईला झोडपले. कुलाबा, चेंबूर, सांताक्रूझ लिंक रोड, कुर्ला, शीव, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, पवई, अंधेरी या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्री ८. ३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्र येथे ४२.० मिमी, तर सांताक्रूझ येथे ११५.८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात ११ वृक्ष उन्मळून पडले.
मुंबई महापालिकेच्या दाव्यांची खिल्ली
पहिल्याच पावसाने मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. अंधेरी सबवेमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणी साचल्यामुळे वाहतूक वळवावी लागली होती. जेजे उड्डाणपुलावरही पाणी साचल्यामुळे समाजमाध्यमांवर पालिकेच्या पावसाळी कामांची खिल्ली उडवण्यात येत होती.
ठाणे जिल्ह्यात संततधार
ठाणे जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. ठाण्यात पावसामुळे वाहनांचा वेग मंदावून अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती. भिवंडीतील काही भागात पावसामुळे पाणी साचले होते. कल्याण येथील ग्रामीण भागात काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
रस्ते कामांमुळे कोंडीत भर
ठाणे : ठाणे शहरातील उड्डाणपूल, रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग, शिळफाटा, घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागला. ठाण्यात रस्ते नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडली होती. वाहतूक कोंडीमुळे कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. काही रिक्षाचालकांच्या नकारघंटेमुळे अनेकांना पायी घरी गाठावे लागले.