मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे गेले काही दिवस उकाडय़ाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पाऊस कोसळत असतानाच भाविकांनी शनिवारी गौरी -गणपतींच्या विसर्जन मिरवणुका काढल्या होत्या. दरम्यान, मुंबईत रविवारी तुरळक पावसाची, तर ठाणे, रायगड भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे परिसरात शनिवारी पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. कुर्ला, गिरगाव, मुलुंड, घाटकोपर, शीव, अंधेरी, सांताक्रूझ, कुलाबा या भागांत पावसाचा जोर अधिक होता. रस्ते, रेल्वे वाहतूक काही अंशी मंदावली होती. पावसातही भाविकांनी विसर्जन मिरवणुका काढून गौरी-गणपतीला निरोप दिला. शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १५.८ मिलिमीटर, तर सांताक्रूझ केंद्रात ५.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हेही वाचा >>> मुंबई: मध्य रेल्वे स्थानकात उभे राहणार ‘सिनेडोम’

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना, तर जळगावसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि पुणे तसेच कोकणातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी व बुधवारीही राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नागपुरात पावसाने दाणादाण; दोन महिलांचा मृत्यू नागपूर : उपराजधानीला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरणाचे निकष डावलून होणारा विकासकामाचा हव्यास नडला आणि अवघ्या तीन तासांच्या पावसाने नागपूर शहराची दाणादाण उडाली. गेल्या दहा वर्षांत झपाटय़ाने झालेले सिमेंटीकरण शहराच्या मुळावर उठले. शुक्रवारी मध्यरात्री कोसळलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे  संपूर्ण शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला. पावसाने शहरात दोन महिलांचा बळी घेतला. शहरात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळू लागला. अंबाझरी तलाव तसेच गोरेवाडा तलाव भरून वाहू लागला आणि नागनदी व पिवळय़ा नदीला पूर आला. त्याचा फटका सखल भागातील झोपडपट्टय़ांनाच नाही तर उच्चभ्रू वस्त्यांनाही बसला. अचानक पुराचे पाणी शिरल्यामुळे मध्यरात्री नागरिकांना जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली.