मुंबई उपनगरांसहीत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहित अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र जोरदार पावसासाठी पोषक असणारी स्थिती आता क्षीण होत असल्याने हा यंदाच्या मौसमातील पावसाचा शेवटचा जोर असेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईमधील अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ, पवई आणि खारमध्ये सकाळपासूनच मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडले असा इशारा हवामान खात्याने कालच जारी केला आहे. दिवसभरामध्ये पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. य हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात ट्विट करताना पुढील तीन ते चार तास मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. “मुंबईकर आणि ठाणेकरांनी आज प्रवास करताना काळजी घ्यावी. पुढील तीन ते चार तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळी ९ वाजताच्या रडारवरील हवामानाच्या अंदाजानुसार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील २४ तासात जोरदार पाऊस पडल्याचं दिसत आहे. पुढील ४८ तास (दोन दिवस) मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे,” असं होसाळीकर म्हणाले आहेत.
गुरुवारी (१५ सप्टेंबर) मुंबईसह कोकणातील बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरसह काही भागांतही हलक्या सरी कोसळल्या. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला अमरावतीत हलक्या सरींची नोंद झाली. पुढील एक ते दोन दिवस पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात काही दिवस राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत १८, १९ सप्टेंबरला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.