मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुक्काम ठोकलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केलं. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईत हाहाकार उडाला. मुंबई शहर आणि उपनगरांत सगळीकडे पाणीच पाणी झालं. मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. तसेच अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, रविवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानं पावसाचं पाणी ओसरलं. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला असून, हवामान विभागाने मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास धोक्याचं असणार आहे.
मुंबई मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी (१७ जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, मुंबईतील जनजीवन कोलमडलं आहे. रविवारी सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वेसह वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला झाल्याचं दिसून आलं. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक भागातील पाणी ओसरलं. त्यामुळे रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा होऊन लोकल सेवा सुरू झाली.
हेही वाचा- पावसानं मुंबईकरांचं पाणी अडवलं! भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड; पाणीपुरवठा खंडित
दुपारी चार वाजेपासून पावसाने जोर पकडला आहे. मुंबई, उपनगरांसह शेजारील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास या चारही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
NOWCAST WARNING at 1600 Hrs 18/07/2021
INTENSE SPELLS OF RAINFALL LIKELY TO OCCUR IN THE DISTRICTS OF #Mumbai, #Thane, #Palghar, #Ratnagiri DURING NEXT 3 HOURS.-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2021
मुंबईकरांना करावा लागला दुहेरी जलसंकटाचा सामना
भांडुप परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखील पाणी शिरलं. त्यामुळे हे पंप हाऊस आणि इतर यंत्रसामग्री देखील बंद करावी लागली. भांडुपच्या याच जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईतल्या बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तेच बंद झाल्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमधला पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच रात्रीपासून संततधारेने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पाणीटंचाईच्या दुहेरी संकटाचा देखील सामना करावा लागला.