शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईत दाणादाण उडाली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कमरेइतकं पाणी साचलं होतं. तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे मुबईतील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेलाही बसला. सकाळीपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आधी पश्चिम, नंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेनं याबद्दलची माहिती दिली आहे.
मुंबईत अतिवृष्टी झाल्यानं प्रचंड हाहाकार उडाला आहे. मुंबईत काही भागांत दुर्घटनाही घडल्या असून, मुंबईच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक रस्त्यांबरोबरच रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. तर सायन्ससह अनेक रेल्वे स्थानकांवरही प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.
दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्याचबरोबर अनेक भागात पावसाने उसंत घेतली असून, पंपद्वारे पाणीउपसा करण्यात आल्यानंतर रेल्वे रुळावरील पाणी कमी झालं. त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली. त्यानंतर मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.
CR monsoon updates at 11.00am
TRAINS on ALL CORRIDORS ARE RUNNING now.
Main line : Trains are running
Harbor line: Trains have resumed.
Trans Harbor line: Trains are running
Trains are running on Belapur/Nerul-Kharkopar line.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 18, 2021
लोकल रेल्वे पुन्हा रुळावर असली, तरी एक्स्प्रेस गाड्यांना मात्र फटका बसला आहे. मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि राज्यातील विविध शहरादरम्यान धावणाऱ्या तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्या आता दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, दिवा आदी रेल्वे स्थानकांपर्यंत येणार आहेत.