राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, रविवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने हजेरी लावली. मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील तीन तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सात जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त कले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरलाही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातील परभणी येथे गेल्या २४ तासांत या भागातील आजवरचा सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

हेही वाचा- अन् मोराचा असा पिसारा फुलला…..

सक्रिय झालेल्या झालेल्या पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असून, पुढील तीन तासांत राज्यातील सात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा ते तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातून सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत पाऊस कोसळत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.

१५ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज

१३ जुलै : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. पुणे जिल्हा घाटक्षेत्र, औरंगाबाद, जालना जोरदार पावसाची शक्यता.

१४ जुलै : मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज. परभणी, हिंगोली, नांदेड हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

१५ जुलै : मुंबई, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains maharashtra monsoon update heavy rainfall very likely at isolated places in mumbai bmh