Mumbai Water Supplying Dams: मुंबईत मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता मात्र रात्री पुन्हा एकदा पावसाचे अनेक भागात थैमान पाहायला मिळाले. शिवाय सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत शहरात (कुलाबा केंद्र) ८९.४ मिमी तर उपनगरांत (सांताक्रूझ केंद्र) ९०.८ मिमी पावसाची नोंद झाली. एकीकडे तुफान पावसामुळे मुंबईकरांची प्रवासाची, घरात पाणी भरण्याची चिंता वाढत असताना दुसरीकडे एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे मोडक सागर धरण काल रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव हे अत्यंत महत्त्वाचे धरण असून याची एकूण पाणी पातळी ही १६३.१४७ मीटर इतकी आहे. या धरण क्षेत्रात झालेल्या २१०९ मिमी पावसानंतर काल मोडक सागर धरण १०० टक्के भरले असल्याचे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे. BMC ने ट्वीटद्वारे नागरिकांना ही आनंदाची माहिती देत मोडक सागर धरणाचा एक सुंदर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामुळे मुंबईकरांची वर्षभरातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
मुंबईकरांनो चिंता मिटली!
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
आज, शुक्रवार सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख धरणांपैकी विहार, मोडक सागर, तुलसी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तानसा धरणात सुद्धा क्षमतेच्या ९९. ५८% पाणी साठा आहे. अप्पर व मध्य वैतरणा, भातसा या धरणातील पाणीसाठा अद्याप कमी आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.