दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढलं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची शनिवारीही कायम असून, मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यानं लोकल वाहतूक कधी संथगतीने, तर कधी थांबवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं दृश्य आहे. मुंबईतील या परिस्थितीवरून भाजपाने सवाल करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाचा अंदाज चुकवत दोन दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं असून, मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघ्याइतकं पाणी साचत आहे. तर काही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांवरही पाणी येत असल्याने लोकल रेल्वेच्या वाहतूकीतही अडथळे येत आहेत. मुंबईत पहिल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Mumbai Rains : पावसाने लावलेल्या ‘ब्रेक’नंतर ‘दादर-कुर्ला’ लोकल सेवा सुरू

“नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पण मुंबईच्या विकासात भरीव योगदान केलं. गडकरींनी मुंबईत ५६ पूल बांधले, फडणवीसांनी मेट्रोचं जाळ विणलं. याउलट मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं? दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे, अनधिकृत बांधकाम व ते पडल्याने जाणारे जीव,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

अतिवृष्टीचा इशारा!

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, नागरिकांनी मोठ्या झाडांखाली उभं राहणं टाळावं तसेच बाहेर पडताना स्वताची काळजी घ्यावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. १३ व १४ जून या कालावधीत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

हेही वाचा- मुंबईत दहा दिवसांतच कोसळला महिन्याभराचा पाऊस

पावसाचं धुमशान सुरूच…

मुंबईत पावसाचं धुमशान सुरूच आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरत आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains updates bmc mumbai news bjp shiv sena keshav upadhye uddhav thackeray bmh