मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असून माता रमाबाई आंबेडकर नगरमधील १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नुकत्यात प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट २ मध्ये रमाबाई नगरातील ६ हजार ५००, तर याआधी प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट २ मध्ये १०२९ असे एकूण ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्गाचा विस्तारीकरण प्रकल्प हाती घेणार आहे. या विस्तारीकरणातील बाधित झोपड्यांसह एकूण १६ हजार ५७५ झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. झोपु आणि एमएमआरडीए संयुक्त भागिदारीतून बाधितांचा पुनर्विकास मार्गी लावणार आहे. त्यानुसार पात्रता निश्चितीची जबाबदारी झोपुवर असून झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून दोन वेळा परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले आहे. झोपुने आधी विस्तारीकरण प्रकल्पात थेट बाधित होणाऱ्या १६९४ रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण करून परिशिष्ट २ प्रसिध्द केले होते. यात १०२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. तर गुरुवारी दुसरे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ६ हजार ५०० रहिवासी पात्र ठरल्याची माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एकूण ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. मोठ्या संख्येने रहिवाशी अपात्र ठरले आहेत. तर यापैकी काही जणांची घरे बंद असल्याने त्यांचे सर्वेक्षण होऊ शकले नाही. अशा घरांचे सर्वेक्षण करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. तर अपात्रांना अपीलाची संधी असणार आहे. त्यामुळे पात्र रहिवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आरटीई कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
दरम्यान आता पात्र रहिवाशांबरोबर करार करून घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू आहे. करार झाल्यानंतर घरभाड्यापोटी दरमहा १५ हजार रुपये अदा करण्यात येणार आहे. त्यानंतर घरे रिकामी करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. घरे रिकामी करून घेतल्यानंतर झोपुकडून जागा मोकळी करून एमएमआरडीएला दिली जाणार आहे. त्यानंतर पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.